'हर हर महादेव'ची विक्रमी कमाई! पहिल्याच दिवशी कमावले..

मुंबई:‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजचा ‘हर हर महादेव’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. सध्या ऐतिहासिक चित्रपटांची मालिका सुरू असल्याने या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत काहीच कल्पना नव्हती, परंतु पहिल्याच दिवशी 'हर हर महादेव'ची गर्जना देशभरात घुमली आहे.



या चित्रपटाच्या ट्रेलरलाही तूफान प्रतिसाद मिळाला होता. अभिनेता शरद केळकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय आणि एकूणच चित्रपटाचे ऐतिहासिक रूप पाहून प्रेक्षक आवाक झाले होते. त्यामुळे चित्रपटालाही तसाच दमदार प्रतिसाद मिळत आहे. सध्या या चित्रपटाचे 400 चित्रपटगृहांमध्ये, पाच भाषांमध्ये 1200 शो सुरू आहेत. हे सर्व शोज् हाऊसफुल्ल हॉट असून पहिल्याच दिवशी चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे.पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटी अशी मोठी धडाकेबाज कमाई केली. पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा गाठणे ही मोठी बाब आहे, त्यामुळे प्रतिसाद अजून वाढला तर या चित्रपटाचे आणखी काही शो लावण्यात येतील, अशी माहिती मिळाली आहे.

सुबोध भावेयांनी अतिशय समंजसपणे साकारलेली शिवाजी महाराजांची करारी बाण्याची भूमिका आणि दमदार व्यक्तिमत्व असलेल्या शरद केळकर  यांनी साकारलेली बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. याशिवाय लढाया, मोहिमा याचे वास्तवदर्शी दर्शन घडत असल्याने हा ऐतिहासिक पट प्रेक्षकांना भावला आहे.अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि सुबोध भावे, शरद केळकर, अमृता खानविलकर, सायली संजीव, निशिगंधा वाड, अशोक शिंदे, मिलिंद शिंदे, हार्दिक जोशी, किशोर कदम, शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने सजलेला ‘हर हर महादेव’ सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. 'स्वराज्याच्या सुवर्णगाथेला प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद, पहिल्या दिवशीचं Box office collection- रु. २.२५ कोटी.' अशी पोस्ट सध्या चित्रपटातील कलाकारांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने