‘तुम्ही उद्योजकांकडून टक्केवारी मागायचा’, प्रसाद लाड यांच्या आरोपाबद्दल विचारताच सुभाष देसाई संतापले, म्हणाले “खबरदार, जर…”

मुंबई:‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडलं आहे. सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना उत्तर दिलं आहे.



प्रसाद लाड काय म्हणाले आहेत?

“महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. २१ सप्टेंबर २०२१ मध्येच एअरबस- टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचं आहे. सुभाष देसाई यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे,” असं प्रसाद लाड यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.“येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवं. भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठं प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडे आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये,” असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला.“आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. सुभाष देसाईच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीबद्दल हे सिद्ध झालं आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांचं पत्राचाळ प्रकरण आहे. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांचा वयाचा, अनुभवाचा आदर करतो. पण त्यांनी अशाप्रकारे शिंदे, फडणवीस यांच्यावर आरोप करण्याआधी आपल्या टोपलीखाली झाकून पाहावं,” असा सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे. वेळ पडल्यास पुरावे समोर आणू असंही ते म्हणाले आहेत.

सुभाष देसाईंचं प्रत्युत्तर

“प्रकल्प वर्षभरापूर्वी गेला असता तर माध्यमांनी आज का बातम्या दिल्या? दोन दिवसांनी भूमीपूजन होणार असून ही तारीख आम्ही दिलेली नाही. हेच खरं असून यापासून पळ काढता येणार नाही,” असं सुभाष देसाई म्हणाले आहेत. प्रसाद लाड यांच्या टक्केवारीच्या आऱोपावर बोलताना ते संतापले. “खबरदार, असले आरोप सहन करणार नाही. ज्यांना आरोप करायचे आहेत त्यांनी पुरावे द्यावेत. किती बालीशपणे बोलत आहेत”.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने