पंधरा दिवसांपूर्वी केलेला रस्ता खोदला.

कोल्हापूर : नवरात्रोत्सवात भाविकांना त्रास होऊ नये म्हणून महापालिकेने रात्रीत डांबरीकरण केलेल्या गुजरीतील रस्ता अवघ्या पंधरा दिवसांच्या अवधीत महापालिकेच्याच पाणीपुरवठा विभागाने खोदला. यातून महापालिकेतील विभागांचा समन्वय नसल्याचे स्पष्ट झाले.

नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिर परिसरात भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. तेथील वसंत मेडिकलजवळील, गुजरीतील असे दोन रस्ते प्रचंड खराब झाले होते. भाविकांना नीट चालताही येत नव्हते. त्यासाठी महापालिकेने दोन रात्रीत त्या रस्त्यांचे डांबरीकरण केले. नागरिकांकडून दिवाळी खरेदी सुरू झाल्याने आता पुढील टप्पा म्हणून त्या रस्त्यांच्या बाजूपट्ट्या कराव्यात, अशी मागणी होत होती. त्यातच पाणीपुरवठा विभागाने जेसीबीने गुजरी कॉर्नर येथे रस्ता खोदून मोठा खड्डा मारून ठेवला. दिवाळी खरेदीसाठी महाद्वार रोडवर ये-जा करण्यासाठी बहुतांशजण गुजरी रोडचा वापर करतात. त्यावरून वाहनांचीही वर्दळ असते. तिथेच खोदाई केल्याने नागरिकांना नीट चालता येत नाही.त्या परिसरात असलेल्या पाण्याच्या तक्रारीसाठी खोदाई केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही तक्रार यापूर्वीही होती, त्यावेळी रस्ता खराब असताना खोदाई करून काम केले नाही. आता रस्ता चांगला झाल्यानंतर काम करण्यासाठी खोदाई करायचे सुचले; पण आता रस्ता खोदू नका, असे माजी नगरसेवक किरण नकाते यांनी कर्मचाऱ्यांना सुनावले होते.



जेसीबीच कशासाठी?

पूर्वी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी जिथे गळती वा काही अडचण असेल तिथे खोदाई करायचे; पण आता जेसीबी बोलवला जातो, त्याने मोठा खड्डा मारला जातो. त्यावेळी आजूबाजूच्या पाईप तसेच टेलिफोनच्या केबल तोडल्या जातात. त्याचा भुर्दंड वेगळाच असतो. ब्रेकरसारखी साधने असल्याने हवी तितकी व इतर सुविधांना धक्का न पोहचवता खोदाई केली जाऊ शकते. त्याबाबतही महापालिकेने गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे नागरिकांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने