गुजरातमध्ये भाजपा दोन तृतियांश बहुमतासह सत्ता कायम ठेवणार; अमित शाहांनी व्यक्त केला विश्वास

 गुजरात : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा दोन तृतियांश बहुमताने विजय मिळवून सत्ता कायम ठेवेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधील जनता अनेक काळापासून भाजपावर विश्वास ठेवत आहे. पक्षानेही त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे. ‘गुजरात गौरव’ यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यापूर्वी अहमदाबादेतील झांझरका परिसरातील संत सवाईनाथ धाममधील सभेत ते बोलत होते. झांझरकामधून सुरू झालेल्या या यात्रेचा गीर सोमनाथ जिल्ह्यातील सोमनाथ मंदिरात समारोप होणार आहे.



भाजपावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करतानाच शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसच्या फसवणुकीला बळी न पडण्याचा सल्ला जनतेला दिला आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्यासह अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम भाजपा सरकारची मोठी कामगिरी असल्याचे शाह यांनी म्हटले आहे. दिवंगत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या चुकीमुळेच काश्मीरचा उर्वरित भारताशी संबंध नव्हता, असा आरोप शाह यांनी केला आहे.

काँग्रेसच्या सत्ताकाळात गुजरातमधील जनतेला २४ तास वीज उपलब्ध होती का? नर्मदेचं पाणी त्यांना मिळत होतं का? असा सवाल करत शाह यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. आधीच्या काळात लोकांना वर्षातील २०० दिवस कर्फ्यूचा सामना करावा लागायचा. मात्र, आता भाजपाच्या सत्ताकाळात राज्यात कर्फ्यूचं निशाणदेखील नाही, असे शाह यांनी म्हटले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाल कडवी टक्कर देणाऱ्या आम आदमी पक्षाविषयी बोलणं या सभेत अमित शाह यांनी टाळलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने