गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AIMIM ने घेतला मोठा निर्णय; काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

गुजरात : गुजरात विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. कोणत्याही क्षणाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. दरम्यान, या निवडणुकीत आम आदमी पार्टी अर्थात आप पक्षाने लक्ष घातले असून आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मागील काही दिवसांपासून सातत्याने गुजरातचा दौरा करत आहेत. तर दुसरीकडे या निवडणुकीत एमआयएम पक्षानेदेखील उडी घेतली आहे. येथे एमआयएम एकूण ४० ते ४५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे.



एमआयएम पक्ष गुजरातमधील एकूण १८२ जागांपैकी ४० ते ४५ जागांवर आपले उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पक्षातील नेत्यांनी पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत एमआयएमकडून दलित आणि मुस्लीम आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आतापर्यंत एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी पाच जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. यातील तीन जागा या अहमदाबाद तर दोन जागा या सुरतमधील आहेत. या पाच जागांपैकी चार जागांवरील उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

फेब्रुवारी २०२१ मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत एमआयएमने चांगली कामगिरी केली होती. पक्षाने येथे लढवलेल्या ४० जागांपैकी २६ जागांवर विजय मिळवला होता. एमआयएमचे मोडासामध्ये नऊ, गोध्रामध्ये सहा, भरूचमध्ये एक तर अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीत सात उमेदवार विजयी झाले होते.दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आमदी पक्षासोबतच एमआयएमने उडी घेतल्यामुळे काँग्रेसला ही निवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. याच कारणामुळे काँग्रेसकडून एमआयएमवर टीका केली जात आहे. एमआयएमकडून विरोधकांना मिळणारी मते फोडण्याचे काम केले जात आहे. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे. ज्या मतदारसंघांवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. अगदी त्याच ठिकाणी एमआयएम आपले उमेदवार उभे करू पाहात आहे, अशी टीका काँग्रेसकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने