बच्‍चू कडू, रवी राणांमध्‍ये संघर्षाची ठिणगी नेमकी केव्‍हा पडली ?

 अमरावती : गेल्‍या काही दिवसांपासून आमदारद्वय बच्‍चू कडू आणि रवी राणा यांच्‍यातील शाब्दिक वाद चांगलाच पेटला आहे. वाक् युद्धात असंसदीय शब्‍दांचा वापरदेखील झाला आहे. पण, सत्‍तारूढ आघाडीतील या आमदारांमध्‍ये संघर्षाची ठिणगी केव्‍हा पडली?, रवी राणांवर बच्‍चू कडू यांचा एवढा राग का आहे?, असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत.राज्‍यात सत्‍तांतर झाल्‍यानंतर मंत्रिमंडळ विस्‍तार झाला, मात्र त्यात स्‍थान न मिळालेल्‍या अपक्ष आमदारांमध्‍ये मंत्रीपदासाठी रस्‍सीखेच सुरू झाली. अमरावती जिल्‍ह्यातून बच्‍चू कडू आणि रवी राणा हे दोघेही मंत्रिपदाच्‍या स्‍पर्धेत आहेत. बच्‍चू कडू तर महाविकास आघाडी सरकारमध्‍ये राज्‍यमंत्री होते. त्‍यावेळी रवी राणा हे बच्‍चू कडू यांचे विरोधक होते. एरवी जिल्‍ह्याच्‍या राजकारणात हे दोघेही नेते यापूर्वी कधीही आमने-सामने आले नव्‍हते. पण, अलीकडच्‍या काळात दोन्‍ही आमदारांनी आपल्‍या छोट्या पक्षाचा विस्‍तार करताना केलेले सीमोल्‍लंघन हे संघर्षाचे मूळ असल्‍याचे बोलले जात आहे.



रवी  राणा यांनी बच्‍चू कडू यांच्‍या मतदार संघात जाऊन ‘मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपय्या,’ असे म्‍हणत टीका केला होती. त्‍यावर लगेच बच्‍चू कडूंनी प्रत्‍युत्‍तर देत ‘आम्‍ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तू मंत्रिपदाच्‍या शर्यतीतही नसता,’ असा टोला लगावला होता. हा वाद नंतर वाढत गेला आणि आता तर हे प्रकरण पोलीस ठाण्‍यातही पोहचले.रवी राणा यांच्‍या पत्‍नी नवनीत राणा यांच्‍या समोर खासदार म्‍हणून काम करताना अचलपूर आणि मेळघाट या दोन विधानसभा मतदार संघांमध्‍ये प्रहार या बच्‍चू कडू यांच्‍या पक्षाचे आव्‍हान आहे. नवनीत राणा यांनी या दोन मतदार संघांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. हा स्‍थानिक सत्तासंघर्ष मात्र शाब्दिक वादातून अधिक टोकदार बनत चालला आहे.बच्चू कडू हे मूळचे शिवसैनिक. त्यांच्या सार्वजनिक राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेनेपासून झाली. ते शिवसेनेचे चांदूरबाजार समितीचे सभापती असताना त्यांनी शौचालय घोटाळा उघडकीस आणला आणि तो प्रचंड गाजला. पुढे ते शिवसेनेतून बाहेर पडले. प्रहार ही संघटना स्‍थापन केली. २००४ पासून सलग चार वेळा ते निवडून आले आहेत. आक्रमक शैलीचे बच्‍चू कडू अलीकडच्‍या काळात सत्तेच्या निकट राहण्‍याच्‍या प्रयत्‍नात दिसून येतात. सत्ताधाऱ्याच्या मागे उभा राहून मतदारसंघासाठी अधिकाधिक निधी कसा मिळवायचा, असे त्‍यांचे धोरण दिसून येते.

दुसरीकडे, रवी राणा हेही स्वतंत्र झेंडा घेऊन राजकारणाच्‍या आखाड्यात उतरले. त्‍यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाला स्‍थानिक पातळीवर फारसे यश मिळालेले नसले, तरी पक्षविस्‍ताराची त्‍यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या निकटचे ते मानले जातात. महाविकास आघाडी सरकारच्‍या स्‍थापनेच्‍या आधी त्‍यांचे समर्थक मंत्रिपदाची अपेक्षा ठेवून होते. त्‍यांचा अडीच वर्षे भ्रमनिरास झाला. आता शिंदे-फडणवीस सरकार येऊनही मंत्रीपद हाती लागलेले नाही, त्‍यामुळे रवी राणा यांचे कार्यकर्ते अस्‍वस्‍थ आहेत. बच्‍चू कडू आणि रवी राणा या दोघांनाही मंत्रीपद हवे आहे. त्‍यांनी त्‍यासाठी चांगलाच पाठपुरावा सुरू केला आहे. पण, यातून निर्माण झालेली अस्‍वस्‍थता आता दोन नेत्‍यांमधील शाब्दिक युद्धात परिवर्तित झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने