विश्लेषण : रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे नवे अध्यक्ष? गांगुलीची फेरनिवड का नाही?

दिल्ली : माजी अष्टपैलू आणि १९८३च्या ऐतिहासिक विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता आहे. ‘बीसीसीआय’ची १८ ऑक्टोबरला निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवार (११ ऑक्टोबर) आणि बुधवारचा (१२ ऑक्टोबर) दिवस होता. मंगळवारी बिन्नी यांनी आपला अर्ज दाखल केला असून आता निवडणूक ही केवळ औपचारिकता असेल असे म्हटले जाते आहे. मात्र, ६७ वर्षीय बिन्नी अचानकपणे ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार कसे बनले आणि सौरव गांगुली अध्यक्षपदाच्या शर्यतीतून कसा बाहेर पडला, याचा घेतलेला आढावा.

बीसीसीआय’ची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकांसाठीच्या प्रारूप मतदार यादीत कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) प्रतिनिधी म्हणून रॉजर बिन्नी यांचे नाव देण्यात आले होते. यापूर्वी, ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सचिव संतोष मेनन हे ‘केएससीए’चे प्रतिनिधित्व करायचे. मात्र, आता या यादीत बिन्नी यांचे नाव आल्यानंतर विविध चर्चांना सुरुवात झाली. त्यानंतर गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यासह ‘बीसीसीआय’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दिल्लीमध्ये बैठका झाल्या. या बैठकांअंती ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदासाठी बिन्नी यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले होते.




दिल्ली येथे झालेल्या ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये अध्यक्ष म्हणून गांगुलीच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली गेली. तसेच ‘बीसीसीआय’शी संलग्न राज्य क्रिकेट संघटनाही गांगुलीच्या कामगिरीबाबत खुश नसल्याचे म्हटले गेले. ‘बीसीसीआय’मध्ये अध्यक्ष म्हणून सलग दोन कार्यकाळ भूषवण्याची प्रथाही नाही. त्यामुळे या बैठकांअंती गांगुलीची अध्यक्षपदी फेरनिवड होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. परंतु ‘बीसीसीआय’कडून गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदासाठी शिफारस केली जाऊ शकते, असे म्हटले जात होते. मात्र, आता त्याचीही शक्यता अत्यंत कमी आहे. गांगुलीने ‘आयपीएल’चे अध्यक्षपद भूषवण्यासही नकार दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने