पूर्वोत्तर भारतीय समाजाच्या छटपूजा व्रताला प्रारंभ

कोल्हापूर : येथील पूर्वोत्तर भारतीय समाजाच्या छटपूजा परंपरेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून, कोरोनानंतर यंदा पारंपरिक उत्साहात हा सोहळा साजरा होणार आहे. सध्या जिल्ह्यात एक लाखाहून अधिक पूर्वोत्तर भारतीयांची संख्या असून, शहरात पंचगंगा घाटासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी हा सोहळा होणार आहे.दरम्यान, आजपासून छटपूजेच्या व्रताला प्रारंभ झाला. त्याला ‘नहा-खाय’ असे म्हणतात. उद्या (शनिवारी) ‘खरना व्रत’ होणार असून, रविवारी (ता. ३०) सायंकाळी छटपूजेला प्रारंभ होऊन सूर्याला सायंकालीन अर्घ्य दिले जाईल. सोमवारी (ता. ३१) पहाटे चार ते सहा या वेळेत उगवतीच्या सूर्याला अर्घ्य देऊन सोहळ्याची सांगता होईल.



काय आहे छटपूजा?

छटपूजा हा विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीतीलच हा एक सोहळा असून, दिवाळीनंतर पाचव्या दिवशी या सोहळ्यानिमित्त व्रताला प्रारंभ होतो. सलग अठ्ठेचाळीस तासांच्या उपवासानंतर मुख्य सोहळा होतो. छटपूजेच्या मुख्य दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास घाटावर रांगोळ्यांचा सडा घालून त्यावर उसाच्या साहाय्याने पूजा मांडली जाते.सुपामध्ये फळांची मांडणी करून त्यांची पूजा केली जाते. त्यानंतर साडेपाच ते साडेसहापर्यंत महिला नदीच्या पाण्यात सूप घेऊन सूर्यास्ताच्या प्रतीक्षेत उभ्या राहतात. मंत्रोच्चारात मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने ही पूजा होते. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या साक्षीने सोहळ्याची सांगता होते.

जिल्ह्यातील परंपरा अशी...

ओडिशा, बिहार, पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमध्ये या पूजेला अधिक महत्त्व दिले जाते. आपल्या परिवारास सुखसमृद्धी मिळण्यासाठी या पूजेचे आयोजन केले जाते; मात्र पूर्वोत्तर भारतीय नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने देशातील अन्य शहरांत स्थायिक झाल्यानंतर ही मंडळी तेथेही छटपूजेचे आयोजन करू लागली.कोल्हापुरात १९९६ मध्ये अरविंद मिश्रा, अनुराधा मिश्रा यांनी पूजेची परंपरा सुरू केली. कलाकुसरीची कामे आणि प्लायवूड व तद्‌नुषंगिक व्यवसायात ही मंडळी आहेत.

सुरक्षा यंत्रणा उपलब्ध करून देण्‍याची मागणी

कोल्हापूर : राजर्षी शाहू पूर्वोत्तर भारतीय संघाच्या वतीने रविवारी व सोमवारी पंचगंगा नदी घाटावर छटपूजेचे आयोजन केले आहे. नदीमध्ये उतरून महिला पूजा करत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक ईश्‍वर परमार यांनी महापालिकेकडे केली आहे. रविवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजता तसेच सोमवारी (ता. ३१) पहाटे चार वाजता महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. त्यावेळी अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी अग्निशमन विभागाकडील वाहन व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे.कोरोनामुळे दोन वर्षे समाजबांधवांनी घरातच छटपूजेचे व्रत केले. यंदा मात्र पारंपरिक उत्साहात हे व्रत होणार असून, नुकतीच बैठक घेऊन समाजबांधवांना आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने