श्रीनगर ते कोल्हापूर सायकल प्रवास १६ दिवसांत पूर्ण.

 कोल्हापूर : ‘सायकल वापरा- प्रदूषण टाळा’ असा संदेश देत कोल्हापुरातील प्रवीण सुतार व वैभव चंदगडकर यांनी श्रीनगर ते कोल्हापूर सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. सुदृढ आरोग्यासाठी सायकल वापरण्याचे महत्त्वही त्यांनी ठिकठिकाणी सांगितले. दोघांनी १६ दिवसांत सुमारे दोन हजार ४८० किलोमीटरचा प्रवास केला.

सुतार व चंदगडकर यांनी १ ऑक्टोबरला श्रीनगर येथून सायकल प्रवासाला सुरुवात केली. चंदरकोटे, चकदयाला जम्मू, जालंदर, आंबाला, मुरथल, होडल, आग्रा, दिल्ली, तनिहार, गुना, सज्जापूर, मानपूर, धुळे, शिर्डी, पारगाव, सातारा या मार्गे ते कोल्हापुरात पोचले. त्यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगत प्रदूषण टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच, आरोग्यासाठी सायकल वापरणे का आवश्‍यक आहे, याबाबतही प्रबोधन केले.



सुतार पाचगाव येथील रहिवासी असून, खासगी कंपनीत नोकरीला आहेत. वयाच्या ४२ व्या वर्षी त्यांनी हा प्रवास केला. चंदगडकर संभाजीनगरात राहतात. तेही खासगी कंपनीत व्यवस्थापक आहेत. या प्रवासासाठी त्यांनी सातत्यपूर्ण सराव केला. रोज किती किलोमीटर अंतर कापायचे, हे निश्‍चित केले. चढ-उताराच्या मार्गावरील अवघड वळणांवर सफाईदार सायकल चालवत त्यांनी प्रवास पूर्ण केला.सुतार म्हणाले, ‘‘आरोग्याच्या तक्रारी उद्‍भवू नयेत, यासाठी प्रत्येकाने व्यायाम करावा. पर्यावरणाची हानी न होता सायकलचा वापर करून व्यायाम करणे कधीही चांगले. तो संदेश देशभर द्यावा, यासाठी आम्ही सायकल प्रवासाचे नियोजन केले होते. अवघ्या १६ दिवसांत आम्ही प्रवास पूर्ण केला. यापुढेही सायकल वापरण्याबाबत आम्ही समाजात जागृती करीत राहू.’’

सायकल चालविण्याचे फायदे....

  • शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते

  • लठ्ठपणा, पक्षघात, मधुमेह, हृदयविकार यांसारखे आजार कमी करण्यास मदत

  • सायकल खरेदी व देखभालीचा खर्चही अन्य वाहनांच्या तुलनेत अत्यल्प

  • सायकल चालविल्याने

  • पर्यावरणाचे रक्षण

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने