अवकाळीच्या नुकसानीचे जागेवर पंचनामे : पालकमंत्री दादा भुसे

नाशिक : बदलत्या वातावरणामुळे राज्यात ढगफुटीसदृश पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यासंदर्भात शेतीच्या नुकसानीचे जागेवर पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीतच दिले आहेत. त्यानुसार पंचनामे सुरू असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पैसेही वर्ग केले जात असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.



शहर पोलिस कवायत मैदान येथे पोलिस स्मृतिदिनानिमित्ताने शहीद पोलिसांना मानवंदना देण्यासाठी आयोजित कार्यक्रमांनंतर पालकमंत्री भुसे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पालकमंत्री भुसे म्हणाले, अवकाळी पावसाचा कहर राज्यभर सुरू आहे. शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत सविस्तर चर्चा करून तातडीने जागेवरच पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, पंचनामा होताच शेतकऱ्यांच्या खात्यावर आत्तापर्यंत साडेतीन ते चार हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत. यापूर्वीचा एनडीआरएफच्या निकषानुसार ६५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला असेल तरच आर्थिक मदतीचा निकष विद्यमान सरकारने रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे, अशीच सरकारची भूमिका आहे. नाशिक जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून, शेतकऱ्याच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही श्री. भुसे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने