दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे…”

 मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर टीका करताना नारायण राणेंनी आम्ही आमच्या नेत्यांबद्दल वाईट ऐकून घेणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला तर यासाठी उद्धव ठाकरे जबाबदार असतील असं राणेंनी म्हटलं आहे.

मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये थेट शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन भाष्य करताना राणेंनी या मेळाव्यातील वक्त्यांवरही टीका केली. वक्त्यांची यादी पाहिल्यावर वैचारिक स्तर घसरल्याचं जाणवलं, असं राणे म्हणाले. तसेच भाजपा आणि शिंदेवर टीका करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा पक्षातील कामाचा अनुभव काय आहे असा सवालही राणेंनी विचारला. या लोकांना फक्त नारायण राणेंवर बोलण्यासाठी आणलं होतं, असा टोलाही नारायण राणेंनी लगावला. त्यांच्या टीकेचा रोख सुष्मा अंधारे यांनी केलेल्या टीकेच्या दिशेने होते.



उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या मेळाव्यावर टीका करताना, “हा मेळावा झाला यात पोकळ वल्गना आणि शिळ्या कढीला उत याशिवाय काही नव्हतं. तोंड बंद नाही केलं आणि कायदा सुव्यवस्था बिघडली तर जबाबदार उद्धव ठाकरे असतील. आम्ही आमच्या नेत्यांबद्दल ऐकून घेणार नाही,” असा इशारा राणेंनी दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविषय उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानांवर भाष्य करताना राणेंनी उद्धव यांचा एकेरी उल्लेख करत, “काय म्हणाला तो, अमित शाहा म्हणून या राज्यातून त्या राज्यात जातात. तुम्ही ३७० हटवलं का काश्मीरमधून? देशातील लोकांना कोण संभाळतंय थोडी तरी मर्यादा बाळगा,” असा टोला लगावला. तसेच उद्धव ठाकरेंनी मेळाव्यातील भाषणादरम्यान अद्यापही डॉक्टरांनी आपल्याला वाकण्यासाठी परवानगी दिलेली नाही असं सांगितलं. याचा संदर्भ घेत राणेंनी, “वाकायला पण डॉक्टर लागतो मग तू काय काम करणार?” असा टोला लगावला.

“परवाच्या मेळाव्यात केलेली टीका ही केलेल्या उपकारांची परतफेड आहे. २०१९ ला मोदींचं नाव आणि फोटो लावून खासदारकी आणि आमदारकीची निवडणूक लढली. मोदींच्या नावावर निवडून आले आणि त्यांच्यावर टीका करता,” असं म्हणत राणेंनी संताप व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने