“मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे…” गटारात राहिल्यासारखे वाटतंय म्हणाणाऱ्या जुही चावलाच्या ट्वीटवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चर्चा तिने केलेल्या ट्वीटनंतर सुरु झाल्या आहे. काही दिवसांपूर्वी जुही चावलाने दक्षिण मुंबईत वायू प्रदूषणाबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. यानंतर तिच्या चाहत्यांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यानंतर आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी जुही चावला यांनी अशाप्रकारची प्रतिक्रिया देण्यापूर्वी थोडा विचार करायला हवा होता, असा सल्ला दिला आहे.

जुही चावलाने दोन दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये तिने दक्षिण मुंबईतील काही भागातील प्रदूषित हवेबद्दल वैयक्तिक मत व्यक्त केले होते. यात जुहीने मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबद्दल भाष्य केलं होतं. “हवेत पसरलेली दुर्गंधी कुणाच्या लक्षात आली आहे का? याआधी अशी दुर्गंधी बांद्रा, वरळीजवळील भागातील खाडीच्या इथून जाताना जाणवायची. आता मात्र ही दुर्गंधी पूर्ण दक्षिण मुंबईत पसरली आहे. या दुर्गंधीमुळे आणि हवेतील प्रदूषणामुळे दिवसेंदिवस आम्हाला गटारात राहत असल्यासारखं वाटत आहे.” असे तिने यावेळी म्हटले. तिच्या या वक्तव्यानंतर सर्वत्र तिच्याबद्दल चर्चा सुरु झाल्या.



नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज तलाव या ठिकाणी छठपूजेसाठी हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी याबद्दल भाष्य केले. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, देवेंद्र फडणवीस यांना यावेळी जुही चावलाचे ट्विट आणि मुंबईतील वाढते वायू प्रदूषण याबद्दल विचारण्यात आला. त्यावर त्यांनी वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावर भाष्य न करताच जुही चावलावरच निशाणा साधला.“मुंबई हे एक महान शहर आहे. या शहरात मुलभूत सुविधांचा अभाव आहे, हे खरे आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारामुळे नागरिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पण आता सरकार बदलले आहे. लवकरच मुंबईही बदलणार आहे. त्यामुळे मुंबईबद्दल अशाप्रकारे बोलणे चुकीचे आहे. मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे कलाकारांनी अशी विधाने करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने