पोलिस बांधवांची दिवाळी गोड करा; मनसेचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई:  दिवाळी सणाला देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला जातो. मात्र, पोलिस विभाग या निर्णयला अपवाद ठरते. राज्यातील पोलिसांना ना बोनस मिळतो ना अडव्हान्स, त्यामुळे पोलीस खात्यात दिवाळीला नाराजीचा सूर पाहायला मिळतो. दरम्यान, पोलिस बांधवांसाठी मनसे धावून आले आहे. थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवत पोलिसांनाही बोनस देण्याची मागणी केली आहे. 



मागच्या दिवाळीमध्ये केवळ सातशे पन्नास रुपयांची कुपन देऊन तोंडाला पाने पुसली होती. त्यामुळे यंदाची दिवाळी तर गोड होईल अशी आशा वाटत होती मात्र, दिवाळी तोंडावर येऊनही अ‍ॅडव्हान्स पगार नाही.कोरोनाकाळी पालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली मात्र पोलिसांनी काही मिळाले नव्हते. त्यामुळे पोलिस विभागात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

अशातच, सणवार असो, कोणतीही आपत्ती असो की संकट असो, सदैव सतर्क आणि कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील पोलीस बांधवांची दिवाळी त्यांना देखील बोनस देऊन गोड करावी, अशी मागणी पक्षाचे सरचिटणीस मनोज चव्हाण ह्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.महाराष्ट्र पोलीस बांधव हे सण, उत्सव, नैसर्गिक आपत्तीसह अतिरेकी कारवायांमध्ये कर्तव्य बजावत असतात. गर्दीत वर्दी असते म्हणूनच धर्माचा उत्सव उत्साहात साजरा होतो. त्यामुळेच, सणासुदीच्या काळाततरी महाराष्ट्र पोलिसांना आर्थिक समाधान द्यायला हवे, असे मनोज चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, यंदा दिवाळीला पोलिस बांधवांना बोनस द्यावा, अशी मागणीच पत्राद्वारे केली आहे.

काही दिवसांपूर्वी, धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने