इलॉन मस्क परफ्युम व्यवसायात! नाव अन् किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, मेंटल...

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसेक्स कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क आता परफ्युम व्यवसायात उतरले आहेत. Burnt Hair नावाचा ब्रँड त्यांनी बाजारात आणला असून त्याची किंमती ८,४०० रुपये आहे. मस्क यांच्या परफ्युमचं नाव आणि किंमत ऐकून नेटकरी मात्र सैराट झाले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसावं की रडावं असं होईल. मस्क यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरुन याची घोषणा केली असून त्यांनी आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल करत परफ्युम सेल्समन असं केलं आहे. तसेच आपल्या Burnt Hair नामक परफ्युम ब्रँडला पृथ्वीवरील सर्वात छान अत्तर असल्याची कॅप्शनही त्यानं दिलं आहे.



मस्क यांनी काय म्हटलंय?

मस्क यांनी याची सविस्तर माहिती देताना म्हटलं की, अत्तराचा व्यवसाय हा टाळता येणारा नाही, त्यामुळं मी इतके दिवस कसा दूर राहिलो? आमचा परफ्युम तुम्ही क्रिप्टो करन्सीद्वारे देखील विकत घेऊ शकता. तसेच डोगच्या स्वरुपात तुम्ही याचे पैसे देऊ शकता. या परफ्युमची किंमत १०० अमेरिकन डॉलर आहे. याच्या १०,००० बॉटलची यापूर्वीच विक्री देखील झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मस्क यांनी म्हटलं होतं की, बोअरिंग कंपनी लवकरच पुरुषांसाठी सेंट लॉन्च करणार आहे. हा सेंट त्यांना गर्दीतही उभं राहण्यास मदत करेल.

दरम्यान, मस्क यांच्या या घोषणेनंतर ट्विटर युजर्सनं मोठ्या प्रमाणावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं मस्कला फ्लेम थ्रोअर अर्थात आग लावणारा असं म्हटलं आहे. हा आग लावणार ५०० डॉलरमध्ये मिळेल, असंही त्यानं म्हटलंय. दुसरा म्हणतो, मस्कला नक्कीच आग लावणाऱ्यांकडून याची प्रेरणा मिळाली नसेल. तुमच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा. तिसऱ्या एकानं म्हटलं की, मेंटल रॉकेट मॅननं मेंटल गोष्ट बनवलीए. इतिहास याची नोंद घेईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने