कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा : अमेरिकेकडून भारताचा पराभव

भुवनेश्वर : यजमान भारताला मंगळवारी कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात बलाढय़ अमेरिकेच्या संघाकडून ०-८ असा मोठा पराभव पत्करावा लागला. कोणत्याही वयोगटातील महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे हे पदार्पण होते. मात्र, अमेरिकेच्या आक्रमक खेळापुढे भारतीय संघाचा निभाव लागला नाही. अमेरिकेच्या संघाने तब्बल ७९ टक्के वेळ चेंडूवर ताबा मिळवला. तसेच त्यांनी गोलच्या दिशेने ३० फटके मारले, याउलट भारतीय संघ केवळ दोनच फटके अमेरिकेच्या गोलच्या दिशेने मारू शकला.



मेलिना रेबिम्बास (९ आणि ३१व्या मिनिटाला), शार्लोट कोहलेर (१५व्या मि.), ओन्येका गमेरो (२३व्या मि.) आणि जिसेल थॉम्पसन (३९व्या मि.) यांनी केलेल्या गोलच्या जोरावर अमेरिकेने मध्यंतरालाच ५-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात एला एमरी (५१व्या मि.), टेलर सुआरेझ (५९व्या मि.) आणि भारतीय वंशाच्या मिया भुटाने (६२व्या मि.) गोल करत अमेरिकेला सामना जिंकवून दिला. अमेरिकेचा कुमारी विश्वचषकातील सर्वात मोठा विजय ठरला. पहिल्या दिवसाच्या अन्य लढतींत चिलीने न्यूझीलंडला ३-१ असे, ब्राझीलने मोरोक्कोला १-० असे, तर जर्मनीने नायजेरियाला २-१ असे पराभूत केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने