आधार प्रमाणिकरणासाठी शेतकऱ्यांची लुबाडणूक.

कोनवडे : शासनाच्या महात्मा जोतिराव फुले योजनेअंतर्गत प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे. भुदरगड तालुक्यातील कूर, मिणचे, दारवाड, म्हसवे, हेदवडेसह परिसरातील महा-ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर व खासगी केंद्रचालकांकडून एका शेतकऱ्यासाठी तब्बल पन्नास ते शंभर रुपये रक्कम घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.



भुदरगड तालुक्यातील ८ हजार ९०७ पात्र लाभार्थी असल्याने अनुदानाचा आकडा लाखांच्या घरात आहे. प्रोत्साहनपर अनुदान मिळवण्यासाठी आतापर्यंत या शेतकऱ्यांना केवायसी भरणे, आधार नंबरला मोबाईल लिंक करणे यासाठी बरेच लुबाडले असताना पुन्हा एकदा आधार प्रमाणीकरणासाठी उघड उघड लुबाडले जात आहे. पैसे परत जातील किंवा मिळणार नाहीत, अशी भीती घालून शेतकऱ्यांच्या आर्थिक लुबाडणुकीचे प्रकार सध्या बऱ्याच ठिकाणी सुरू आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या खासगी व शासन नियंत्रित महा-ई-सेवा केंद्रचालकांवर कारवाई होणार का, असा संतप्त सवाल लाभार्थी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांना ऑनलाईनच्या नावाखाली महा ई सेवा कार्यालयाच्या दारात ताटकळत बसावे लागत आहे. त्यांची ही फरपट थांबणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. अगोदरच कागदपत्रांनी शेतकरी मेटाकुटीला आलेला असून, त्यात त्याला खुलेआम लुटण्याचा प्रकार ऑनलाईन केंद्रचालकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने