“संवाद शिवकालीन वाटत नाही…” अमोल मिटकरींनी ‘हर हर महादेव’ चित्रपटावर घेतला आक्षेप

 मुंबई :  झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या बहुप्रतीक्षित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व असलेल्या बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मात्र नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या चित्रपटावर आक्षेप नोंदवला आहे.अमोल मिटकरी यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी हर हर महादेव या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात दाखवलेली अनेक दृश्य ही इतिहासाला धरुन नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी दोन ट्वीट केले आहे.



“VFX तंत्रज्ञानाचा अतिवापर “हर हर महादेव”या चित्रपटात जाणवला. सुबोध भावे यांनी साकारलेली “छ.शिवरायांची ” भुमिका (अभिनय छान असला तरीही ) रसिक मनाला पटणारी नाही. चित्रपटातील संवाद शिवकालीन वाटत नाहीत. श्री राज ठाकरे यांचे निवेदन चित्रपटात सर्वात प्रभावी वाटते”, असे ट्वीट अमोल मिटकरींनी केले आहे.“अफजल खानाचा कोथळा काढतांना खानाने महाराजांच्या डोक्यावर वार केल्यानंतर दाखवलेला रक्तस्त्राव वा सईराणी साहेब व महाराजांना जिजाऊ साहेबांनी एकेरी भाषा वापरल्याचे मी तरी वाचले नाही. बाजीप्रभु यांची शब्दफेक व जेधे _ बांदल यांच्यातील दाखवलेले वैर इतिहासाला धरून नाही”, असेही ते ट्वीट करत म्हणाले.

दरम्यान ‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजचा ‘हर हर महादेव’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. सध्या ऐतिहासिक चित्रपटांची मालिका सुरु असल्याने या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळेल याबाबत काहीच कल्पना नव्हती. परंतु पहिल्याच दिवशी ‘हर हर महादेव’ची गर्जना देशभरात घुमली. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.२५ कोटींची कमाई केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने