सच्चा मुसलमान कधीही भाजपला मत देऊ शकत नाही; सपा आमदाराचं विधान.

नवी दिल्ली - भाजप कधीही मुस्लिमांचा होऊ शकत नाही आणि कितीही प्रयत्न केला तरी मुस्लिम समाज भाजपला मतदान करणार नाही, असं विधान समाजवादी पक्षाचे (सप) नेते आणि आमदार इक्बाल महमूद यांनी केले आहे. मुस्लिमांचा कट्टर विरोधक दुसरा तिसरा कोणी नसून भाजप आहे. जो खरा मुसलमान आहे, तो भाजपला मत देणार नाही, असंही ते म्हणाले.



भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या मुस्लिमविरोधी संघटना असून त्या कधीही मुस्लिमांच्या असू शकत नाहीत, असा आरोप महमूद यांनी केला. 'महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेची पूजा करणाऱ्यांवर मुस्लिम कधीच विश्वास ठेवू शकत नाहीत,' असही ते म्हणाले.

तेलंगणाचे मुस्लिम नेते असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) ही भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोपही इक्बाल महमूद यांनी केला. तसेच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय एजन्सींना घाबरत आहेत. त्यामुळे मायावती कधीही भाजपविरोधात काही बोलत नाहीत, असही इक्बाल महमूद यांनी म्हटलं.दरम्यान समाजवादी पक्ष हा एकमेव पक्ष आहे जो भाजपविरोधात लढत असल्याचं महमूद यांनी नमूद केलं. सपा आमदाराने हे विधान अशा वेळी केले आहे, जेव्हा सत्ताधारी भाजप मुस्लिम समाजातील पसमंडा (मागास) वर्गाला आगामी महापालिका निवडणुकीसाठी आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने