ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद; वडील शिंदे गटासोबत, तर मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा!

 मुंबई : अनेक राजकीय घडामोडींनंतर अखेर शिवसेना आणि शिंदे गट असे दोन्ही दसरा मेळावे मुंबईत पार पडले. अपेक्षेप्रमाणे दोन्ही बाजूंनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप केल्याचं यावेळी दिसून आलं. मात्र, त्यासोबतच चर्चा झाली ती या मेळाव्यांना उपस्थिती लावलेल्या इतर नेतेमंडळींची. उद्धव ठाकरेंचे बंधू जयदेव ठाकरे हे शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्यासह व्यासपीठावर आल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावेळी जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता त्यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे पिता-पुत्रांमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं आहे.



जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा देत असल्याचं सांगतानाच भविष्यात जर आपल्यावर शिवसेनेनं जबाबदारी दिली, तर ती पार पाडण्यासाठी निश्चितच काम करेन, असंही जयदीप ठाकरेंनी टीव्ही ९ शी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आगामी काळात आणखीन एक ठाकरे राजकारणात सक्रीय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, अशा संकटप्रसंगी कुटुंबासमवेत असं, हे माझं कर्तव्यच आहे, अशी भूमिका जयदीप ठाकरेंनी मांडली आहे. “कुणी कुठली बाजू घ्यायची, तो त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाचं आपापलं मत असतं. ते तिथे का गेले, हे त्यांनाच विचारायला हवं. मी या घराचा सर्वात मोठा नातू आहे. मला माझ्या आजोबांबद्दल, उद्धव काकांबद्दल, आदित्यबद्दल प्रचंड आदर आहे. आपल्यासमोरचं हे चित्र फार विचित्र आहे. अशा वेळी माझ्या कुटुंबासोबत असणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी उद्धव काकांच्या सभेला गेलो”, असं जयदीप ठाकरे म्हणाले.

“पुढे-मागे जर मला संधी मिळाली किंवा त्यांना वाटलं की माझ्यावर एखादी जबाबदारी सोपवावी, तर ती मी १०० टक्के स्वीकारेन आणि पक्षाला वाढवण्यासाठी नक्कीच मदत करेन. रश्मी काकी आणि आदित्य यांच्याशी मी बोलत असतो. दसरा मेळाव्याच्या दिवशीही आम्ही बोललो. उद्धव काकांनाही भेटलो. त्यांना मला व्यवस्थित भेटायचं आहेच. त्यांची वेळ घेऊन लवकरच त्यांना भेटेन”, असंही जयदीप ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने