‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये होणार अण्णा नाईकांची एन्ट्री, साकारणार ‘ही’ महत्त्वपूर्ण भूमिका

मुंबई:  ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेद्वारे श्रेयस तळपदेने टेलिव्हिजन विश्वामध्ये पुनरागमन केले. थोड्याच काळामध्ये श्रेयस आणि प्रार्थना बेहरे यांची यश-नेहा ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. मालिकेमध्ये प्रत्येक पात्र त्यांना आपलेसे वाटू लागले. मध्यंतरी ही मालिका बंद होणार असल्याचे म्हटले जात होते. मिळालेली ही माहिती खोटी असल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते.



सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. यश आणि नेहाच्या अपघात झाला असल्याचा ट्रॅक सुरु आहे. अपघातामध्ये यशला गंभीर दुखापत होते, तर नेहाचे निधन होते. नेहाच्या जाण्याचा यश आणि परी यांच्या आयुष्यावर झालेला परिणाम मागच्या काही भागांमध्ये दाखवण्यात आला आहे. याच सुमारास प्रार्थनाने सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन ती मालिकेमध्ये अनुष्का हे नवे पात्र साकारत असल्याचे लक्षात येत आहे.

प्रार्थनाचा हा नवा लुक प्रेक्षकांना आवडला आहे. तिच्या अनुष्का या पात्रासह जयंतीलाल मेहता या नव्या पात्राची एन्ट्री मालिकेमध्ये होणार आहे. हा जयंतीलाल मेहता कोण आणि त्याचा अनुष्काशी कसले संबंध आहेत हे रहस्य पुढच्या भागांमध्ये उलगडणार आहे. अभिनेते माधव अभ्यंकर या मालिकेमध्ये जयंतीलालच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. अनुष्कानंतर जयंतीलाल मेहताच्या येण्याने मालिकेमध्ये नवीन काय घडणार आहे याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने