चित्रपट महामंडळासाठी पाच फेब्रुवारीला मतदान.

 कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक आता नव्या वर्षात पाच फेब्रुवारीला होणार आहे. आठ फेब्रुवारीला मतमोजणी होणार असून, कोल्हापूर, पुणे, मुंबई या तीन ठिकाणीच मतदान केंद्रे असतील. नऊ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया दहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत महामंडळाचे सभासद मोठ्या संख्येने वाढले असले तरी साठ ते सत्तर टक्क्यांहून अधिक सभासदांनी वार्षिक वर्गणी भरली नसल्याची माहितीही आता पुढे येत आहे.



महामंडळातील सत्तारूढ आणि विरोधकांतील वादही टोकाला गेला आहे. त्यातूनच दोन्ही गटांनी परस्पर निवडणूक कार्यक्रम जाहीर केले. मात्र, धर्मादाय आयुक्त प्रदीप चौधरी यांनी हे दोन्ही कार्यक्रम रद्द करून १९ सप्टेंबरला सात दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी धर्मादाय निरीक्षक आसिफ शेख यांनी पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ मागितली. त्यानुसार या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, महामंडळातील वाढलेली सभासद संख्या आणि परस्परविरोधी तक्रारींची शहानिशा झाल्यानंतरच निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. फक्त सभासद यादीचाच ताळमेळ घालण्यासाठी किमान एक महिना जाईल, अशी शक्यता आहे.

वाढत्या सभासदांविषयी तक्रार

महामंडळाच्या २४ एप्रिल २०१६ ला झालेल्या निवडणुकीवेळी केवळ तीन हजार ९०० सभासद मतदानास पात्र होते. मात्र, त्या वेळी एकूण ‘अ’ वर्ग सभासद संख्या १३ हजार ६१०, ‘ब’ वर्ग चार हजार २२१, आजीव सभासद एक हजार ४१, तर सन्माननीय सभासद संख्या ९१ इतकी होती. तीन वर्षांपूर्वी हीच संख्या अनुक्रमे १९ हजार १३८, १४ हजार ९३९, एक हजार २३३ आणि १२१ अशी म्हणजेच ३५ हजारांहून अधिक होती. गेल्या दोन वर्षात आता हीच संख्या बावन्न हजाराच्या पुढे गेली आहे. एकूणच पाच वर्षांत सभासद संख्या चौपटीने वाढली आहे. महामंडळाच्या भल्यासाठी ही गोष्ट चांगली असली तरी सभासद नोंदणी अर्जांचे गठ्ठेच महामंडळात आल्याने त्याबाबत काहींच्या तक्रारी आहेत. या तक्रारींना प्रादेशिक वादाचीही किनार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने