“एका खासदाराच्या मनात याप्रकारची भीती निर्माण केली जातेय, तिथे सामान्यांची काय गत?”

मुंबईः  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार राजन विचारे यांनी आज त्यांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र पोलीस महासंचालकांना पाठवलं आहे. एवढंच नाहीतर माझी सुरक्षा कमी करण्यात आली असून माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे. खासदार राजन विचारेंच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खबळबळ माजली आहे. यावर आता विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.



“एका खासदाराच्या मनात याप्रकारची भीती निर्माण केली जातेय, तिथे सामान्यांची काय गत? शिंदे – फडणवीस सरकार महाराष्ट्रात हुकूमशाही रुजवू पाहत आहे का?” असं नाना पटोले ट्वीटद्वारे म्हटले आहेत.महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना विचारे यांनी पाठवलेल्या पत्रामध्ये सध्या सूडबुद्धीने राजकारण केलं जात असून ठाकरे समर्थक कार्यकर्त्यांविरोधात खोट्या केसेस नोंदवल्या जात असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला आहे. तर स्वत:ला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन हे सर्व होत असल्याचा आरोपही विचारे यांनी केला आहे.‘माझ्या अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केल्याबाबत’ या विषयाअंतर्गत विचारे यांनी पत्र लिहिले असून पत्राचा संदर्भ यापूर्वी दिलेल्या पत्राशी जोडण्यात आला आहे. “महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या दडपशाहीबाबत आम्ही आपणास दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ रोजी दिलेले पत्र” असं सुरुवातीला विचारे यांनी पत्रात संदर्भ देताना म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने