राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : सेनादलाचा विजेतेपदाचा चौकार, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी.

सूरत : सात वर्षांच्या कालखंडानंतर पार पडलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा सेनादलाने बाजी मारली. सेनादलाने ६१ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३२ कांस्य अशा एकूण १२८ पदकांसह सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. या स्पर्धाचा समारोप सोहळा बुधवारी उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या हस्ते पार पडला. 

महाराष्ट्राला ३९ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ६३ कांस्य अशा सर्वाधिक १४० पदकांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हरयाणाने ३८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्य अशा ११६ पदकांसह तिसरे स्थान मिळविले. महाराष्ट्राने आपल्या मोहिमेची सांगताही सोनेरी यशाने केली. बॉक्सिंगमध्ये निखिल दुबेने ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. महाष्ट्राला पहिल्याच दिवशी नेमबाजीत रुद्रांक्ष पाटीलने सुवर्णपदक मिळवून दिले होते.


२८ क्रीडा प्रकारांत महाराष्ट्राला पदके

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ३६ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्राने २८ क्रीडा प्रकारांत किमान एक पदक मिळविले. यामध्ये सर्वाधिक २२ पदके (५ सुवर्ण, ५ रौप्य, १२ कांस्य) जलतरणात पटकावली. त्यानंतर योगासनात १४ आणि मल्लखांबमध्ये १२ पदके मिळविली. महाराष्ट्राला सर्वाधिक ६ सुवर्णपदके मल्लखांबमध्ये मिळाली.निखिलचे ऐतिहासिक सुवर्णयश निखिलची उपांत्य लढत पाहण्यासाठी त्याचे प्रशिक्षक धनंजय तिवारी मोटारसायकलने मुंबईहून गुजरातला निघाले होते. मात्र, वाटेत त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त निखिलला उपांत्य लढतीपूर्वीच कळाले होते. मात्र, निखिलने दु:ख विसरून उपांत्य लढत जिंकली आणि त्यानंतर बुधवारी अंतिम फेरीतही मिझोरमच्या मलसाव मितलुंगचा धुव्वा उडवून त्याने ऐतिहासिक सुवर्णपदक मिळविले. निखिलच्या आक्रमक खेळापुढे मलसाव निष्प्रभ ठरला. त्यामुळे पंचांनी निखिलच्या बाजूने ५-० असा कौल दिला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने