तुमच्या निर्णयांचे जगावर दुष्परिणाम; निर्मला सीतारामन यांचा आक्षेप.

 वॉशिंग्टन : विकसित देशांच्या काही राजकीय आणि आर्थिक निर्णयांचे जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत असून ही चिंतेची बाब आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितले. या परिणामांबाबत भारताबरोबरच इतरही अनेक देशांनी चिंता व्यक्त केली असल्याचेही सीतारामन यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीनंतर सीतारामन यांनी आज येथे आलेल्या भारतीय पत्रकारांबरोबर संवाद साधला. ‘अनेक विकसित देशांनी अंतर्गत पातळीवर किंवा द्विपक्षीय पातळीवर घेतलेल्या राजकीय आणि आर्थिक निर्णयांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. हा मुद्दा मी अमेरिका दौऱ्यात अनेक बैठकांमध्ये उपस्थित केला.



इंडोनेशियासह इतरही काही देशांनी हीच चिंता व्यक्त केली. विकसित देशांच्या अशा काही निर्णयांमुळे भारतासारख्या देशांचे नुकसान होत आहे,’ असे सीतारामन यांनी सांगितले. विकसित देशांच्या निर्णयांमुळे होणाऱ्या विपरित परिणामांची जबाबदारी याच देशांनी घ्यायला हवी, अशी मागणी सीतारामन यांनी जागतिक बँकेच्या बैठकीमध्ये केली होती. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण, रशियावर घातलेले निर्बंध, युरोपमधील इंधन कमतरता या पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी हा मुद्दा जागतिक व्यासपीठावर उपस्थित केला.

‘ईडी’चा राजकीय वापर नाही

भारतात सक्तवसुली संचालनालय (ईडी) ही पूर्णपणे स्वायत्त संस्था असून या संस्थेचा राजकीय कारणासाठी किंवा विरोधकांवर सूड उगविण्यासाठी वापर केला जात नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केले. ‘ईडी’च्या भारतात होणाऱ्या कारवाईबाबत पत्रकारांनी प्रश्‍न विचारला असता सीतारामन यांनी, ‘ईडी’ आणि प्राप्तिकर विभागाच्या कारवाईमुळे उद्योग क्षेत्रामध्ये आणि जनतेमध्येही कोणत्याही प्रकारच्या भीतीची भावना नसल्याचा दावा केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने