“मला खूप काही माहिती आहे, पण मी बोलत नाही कारण..”, इम्रान खान यांचा पाकिस्तानच्या ‘ISI’ला इशारा!

पाकिस्तान: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील प्रमुख गुप्तहेर संस्था ‘आयएसआय’चे (ISI) प्रमुख लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजूम यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “कान उघडा आणि नीट ऐका. मला खूप काही माहिती आहे पण देशाचं नुकसान होऊ नये, यासाठी मी गप्प आहे”, असा इशारा आयएसआयला लाहोरमधील एका जाहीर सभेत इम्रान खान यांनी दिला आहे. यावेळी खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा जयजयकार करत राष्ट्रध्वजासह पक्षाचे झेंडे फडकावले.



नदीम यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत इम्रान खान यांच्यावर गंभीर आरोप केले होते. इम्रान खान यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना मार्चमध्ये झालेल्या राजकीय गोंधळात सरकारला उलथवण्यासाठी आकर्षक ऑफर दिली होती, असा आरोप नदीम यांनी केला होता. या आरोपानंतर इम्रान खान यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. नदीम यांचे आरोप इम्रान खान यांनी फेटाळले आहेत. “हे आरोप एकतर्फी असून ते केवळ माझ्याच विषयी बोलतात. सरकारमधील चोरांविरोधात ते काहीच बोलत नाहीत”, अशी टीका खान यांनी केली आहे.

“देशाच्या उन्नतीसाठी मी विधायक टीका करत आहे. नाही तर बोलण्यासाठी बरंच काही आहे. माझ्या देशाला मुक्त करणं आणि स्वतंत्र देश बनवणं फक्त हेच उद्दीष्ट आहे”, असं लाहोरमधील सभेत खान यांनी म्हटलं आहे. मी कधीही देश सोडणार नाही. याच देशात जगणार आणि मरणार, असे यावेळी इम्रान खान यांनी ठासून सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने