शास्त्रीय पद्धतीने गडाचे संवर्धन व्हावे

 पन्हाळा : पन्हाळा दरवर्षी ढासळत आहे, त्याच्या दुरुस्तीसाठी शासनस्तरावर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, या गडाचे जतन आणि संवर्धन शास्त्रीय पद्धतीने व्हावे, गडाचे बांधकाम बेसाल्ट, चुना, माती, धातू अशा विविध प्रकारच्या साहित्याने झाले आहे. संवर्धन करताना या गोष्टीचा विचार व्हावा, असे मत पुरातत्त्व अभ्यासक सचिन पाटील यांनी व्यक्त केले. इंजिनिअर्स डे आणि वर्ल्ड आर्किटेक्चर डे, कोल्हापुरातील इंजिनिअर्स ॲण्ड आर्किटेक्ट असोसिएशनतर्फे पन्हाळा गडावर साजरा करण्यात आला.

या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून पाटील यांना निमंत्रित केले होते. या वेळी ते बोलत होते. पन्हाळगडाची होणारी पडझड, त्याकडे पुरातत्त्व खात्याचे होणारे दुर्लक्ष आणि पन्हाळवासीयांसह शिवप्रेमींनी याबाबत उठवलेला आवाज याची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि आमदार डॉ. विनय कोरे यांनी भूगर्भ शास्त्रज्ञ, बांधकामातील तज्ज्ञ, तसेच पुरातत्त्व खात्याचे अधिकारी यांची बैठक घेऊन गडाचे जतन आणि संवर्धन योग्य प्रकारे व्हावे, यासाठी आर्किटेक्ट असोसिएशनला पडलेल्या तसेच पडू पाहणाऱ्या भागाची पाहणी करून त्याचा आराखडा बनवण्याची जबाबदारी दिली होती. त्यानुसार या टीमने तीन वेळा पाहणी करून आराखडा बनविण्यास सुरुवात केली आहे.या टीमने सचिन पाटील यांच्याबरोबर चार दरवाजा तसेच तीन दरवाजांची पाहणी करून त्यांची बांधणी, बुरूज, तटबंदी बांधताना त्याकाळी वापरलेले साहित्य, पाणी वाहून जाण्यासाठी केलेली अंतर्गत व्यवस्था यांची पाहणी केली. या वेळी पाटील यांनी या गडाची बांधणी जरी शिलाहार राजांच्या अगोदर झाली असली, तरी येथे आलेल्या सातवाहन, चालुक्य, यादव, आदिलशाह, ब्रिटिश, मराठा.

आदी राजवटींनी त्यात आपापल्या परीने सुधारणा केली असल्याचे दाखवून दिले.

पाटील यांनी पूर्वीचा पन्हाळ्याचा नकाशा, इमारती, पाण्याची व्यवस्था यांचे दृकश्राव्य माध्यमातून त्यांनी दर्शन घडविले. इतिहास हा लिखित स्वरूपात असतो. पण, त्याचे पुरावे मिळतातच असे नाही. पण, पुरातत्त्व खाते शास्त्रीय अभ्यास करून, तज्ज्ञांचे मत घेऊन, प्रयोगशाळेत त्यावर प्रयोग करून मग त्यावर निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले. शिलालेखाच्या माध्यमातून इतिहास कसा उलगडता येतो, हेही त्यांनी उदाहरणांसह सांगितले. प्रारंभी विश्‍वेश्‍वरय्या आणि ली कार्बुजिये यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी असोसिएशनचे सभासद, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते धनंजय भोसले उपस्थित होते. सचिव राज डोंगळे यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष विजय चोपदार यांनी आभार मानले.

आराखड्याचे काम सुरू

पन्हाळा नगर परिषदेतर्फे २०१९ मध्ये पन्हाळागड संवर्धन आराखडा तयार करण्याबाबत असोसिएशनची नेमणूक केली. यानंतर असोसिएशनतर्फे गडावर हेरिटेज वॉक घेतला. परंतु, त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने काम थांबवावे लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर असोसिएशनने नगरपालिका, संवर्धन तज्ज्ञ, केंद्र सरकारचा पुरातत्त्व विभाग, भूगर्भ शास्त्रज्ञ, इतिहास संशोधक, पुरातत्त्व संशोधक, असोसिएशनमधील विषयातील तज्ज्ञ, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आता कामाला सुरुवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने