Telangana : राष्ट्रीय राजकारणात KCR यांची दमदार एन्ट्री; स्वत: च्या पक्षाचं नाव बदलून दिलं 'हे' नवं नाव

  तेलंगणा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao KCR) यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर त्यांच्या पक्षाचं म्हणजेच, तेलंगणा राष्ट्र समितीचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi BRS) केलं आहे.केसीआर यांच्या या निर्णयामुळं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली असून मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलंय. केसीआर यांचं हे पाऊल टीआरएसच्या राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याच्या आणि भाजपशी प्रभावीपणे सामना करण्याच्या पक्षाच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचं मानलं जातं आहे. याबाबतचा ठराव पक्षाच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं. पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी ठरावाचं वाचन करुन घोषणा केली की, पक्षाच्या सर्वसाधारण सभेनं टीआरएसचं नाव बदलून बीआरएस करण्याचा निर्णय घेतला आहे.पक्षाचं नाव बदलल्यानंतर आता राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा देशभर प्रचार केला जाणार आहे. इतकंच नाही तर समर्थकांनी हैदराबादच्या रस्त्यावर 'देश का नेता केसीआर' अशी घोषणा देणारे पोस्टरही लावले आहेत. या पोस्टरच्या माध्यमातून केसीआर यांचं राष्ट्रीय नेते म्हणून वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने