'तसं' झालं नाही म्हणून राष्ट्रवादीमुळंच भाजपची सत्ता आली; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

सातारा : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळं राज्यातलं राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेलंय. मविआचं सरकार कोसळून आता शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालंय, त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा भाजप सत्तेवर आलं आहे. यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी 2014 चा दाखला देत राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.



'तेव्हा राष्ट्रवादीनं अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढला'

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी  राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) आघाडी सरकारचा पाठिंबा काढला आणि महाराष्ट्रातील भाजप सत्तेत येण्यास मदत झाली. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमुळंच फडणवीसांची सत्ता आली, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय. ते कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 2014 मध्ये राज्यात आघाडीचं सरकारचं काम चांगलं होतं. मात्र, तेव्हा राष्ट्रवादीनं अचानकपणे सरकारचा पाठिंबा काढला. त्यावेळी राष्ट्रवादीनं जर हे सरकार पाडलं नसतं, तर पुन्हा आघाडीचंच सरकार सत्तेत आलं असतं. मात्र, तसं झालं नाही आणि याचा भाजपला (BJP) फायदा झाला. त्यामुळं राज्यात फडणवीसांचं सरकार  सत्तेत यायला कोण कारणीभूत आहे, हे सगळ्यांना समजलं, असं म्हणत चव्हाणांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

'मल्लिकार्जुन खर्गे चांगलं काम करतील'

यावेळी चव्हाणांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. भारत जोडो यात्रा म्हणजे ‘मोदी हटाव यात्रा’ आहे. जोपर्यंत मोदी पंतप्रधानपदावर आहेत तोपर्यंत देशात दूषित वातावरण राहणार आहे, त्यामुळं बदलाची गरज आहे. काँग्रेसला आगामी निवडणुका जिंकाव्याच लागतील, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे चांगलं काम करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

'मोदी जे करत आहेत, ते दुर्भाग्यपूर्ण आहे'

राज्यातून वेदांता-फॉक्सकाॅनपाठोपाठ आता टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला आहे. यावरही चव्हाण यांनी भाष्य केलंय. गेल्या अनेक वर्षात राज्यात मोठा प्रकल्प नाही. हे दुर्दैव आहे. एअरबसबाबत प्रकल्प गुजरातला जाणार हे स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत कोणत्याच पंतप्रधान यांनी आपलं राज्य, आपलं शहर असा दुराग्रह केला नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान असतात. पण, आता मोदी जे करत आहेत. ते दुर्भाग्यपूर्ण आहे, अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने