‘सिल्व्हर ओक’वर हल्ला प्रकरणातील ११८ निलंबित ST कर्मचाऱ्यांना CM शिंदेंनी पुन्हा सेवेत घेतलं: शरद पवार म्हणाले, “सरकारचा निर्णय…”

  नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय राज्यामध्ये तीन महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. शिंदे सरकारने शुक्रवारी पार पडलेल्या एका बैठकीमध्ये हा निर्णय घेतल्यानंतर आता शरद पवार यांनी या निर्णयावर अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.



एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी एसटीसंदर्भातील कर्मचाऱ्यांचे पगार, वेगवगेळ्या उपाय योजना, सातवा वेतन आयोग, महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्याचा निर्णयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. या बैठकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुनच देण्यात आली.

शिंदे सरकारच्या याच निर्णयाबद्दल शरद पवारांना आज नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला शरद पवार यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं. तुमच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करुन घेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. याबद्दल काय सांगाल, असा प्रश्न पवार यांना विचारण्यात आला. त्यावर पवार यांनी अवघ्या पाच शब्दांमध्ये उत्तर दिलं. घरावर हल्ला करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याच्या निर्णयावरील प्रश्नाला उत्तर देताना पवार यांनी, “सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावं,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने