‘भारत जोडो’ यात्रेतून सेवाग्राम का वगळले?

वर्धा : सत्ताधारी पक्षाच्याही नजरेत भरलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेने सेवाग्राम हे स्थळ का वगळले? याची चांगलीच चर्चा सुरू झाली. काँग्रेससाठी राजकीय तीर्थक्षेत्र असलेल्या सेवाग्राम आश्रमातून काँग्रेसच्या अनेक कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. दोन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ऐतिहासिक सभा सेवाग्राम आश्रम परिसरात संपन्न झाली होती. राहुल गांधींसह काँग्रेसच्या सर्वच बड्या नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती. महाराष्ट्रात पक्षाचा राष्ट्रीय उपक्रम झाल्यास सेवाग्रामला भेट निश्चित मानली जाते. अशा पार्श्वभूमीवर भारत जोडो यात्रेने मात्र विदर्भात धार्मिक तीर्थक्षेत्र शेगावला पसंती दिली आणि राजकीय तीर्थक्षेत्र सेवाग्राम वगळले. असे का, याचे निश्चित कारण पुढे आले नाही. सेवाग्रामच नव्हे तर साबरमतीसुद्धा यात्रेत नाही. कारण ही यात्रा राजकीय हेतू ठेवून मुळीच सुरू झालेली नाही. देशाच्या मध्यवर्ती भागातून यात्रा काढण्याचे नियोजन झाले आहे. तसेच ज्या क्षेत्रात भेटी किंवा कार्यक्रम घेण्यात काँग्रेस पक्ष मागे पडला, अशाच भागातून यात्रा काढण्याचे उद्दिष्ट्य असल्याचे दिसून येते, असे एका नेत्याने स्पष्ट केले.



सेवाग्राम व पवनार ही दोन स्थळे काँग्रेस पक्षाने प्रेरणास्थान म्हणून जपली. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पवनारला भेट देत काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करण्यास प्रारंभ केला होता. त्याची आठवण आता काढली जाते. यात्रेच्या नांदेड प्रभारी असलेल्या काँग्रेस नेत्या चारूलता टोकस म्हणतात, कसलाच राजकीय हेतू ठेवून ही यात्रा निघालेली नाही. तसे असते तर निवडणुका असलेल्या गुजरातमधूनही यात्रा निघाली असती. यात्रेच्या सुरुवातीला सेवाग्रामला यात्रा यावी म्हणून वरिष्ठ नेत्यांकडे विनंती केली होती. मात्र मार्ग निश्चित झाला असल्याने वेळेवर बदल करणे शक्य नसल्याचे उत्तर मिळाले. काँग्रेससाठी महात्मा गांधी केवळ प्रतिकात्मक नाही. त्यांचे विचार मानणारा व अंमलात आणणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. म्हणून यात्रेत सेवाग्राम नसल्याचा बाऊ करण्याचे कारण नसल्याचे श्रीमती टोकस यांनी स्पष्ट केले.

यात्रेत सेवाग्रामला टाळण्याचे आणखीही एक राजकीय कारण ऐकायला मिळते. पक्षांतर्गत गटबाजीने आज जिल्ह्यात काँग्रेस पोखरली आहे. आमदार रणजीत कांबळे विरूद्ध इतर सगळे, असे गटबाजीचे टोकाचे चित्र आहे. कार्यकारिणीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या सभेला गटबाजीचे गालबोट लागले होते. राहुल गांधींच्या उपस्थितीतच रणजीत कांबळे व शेखर शेंडे यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दखल घेत नेत्यांची हजेरीही घेतली. त्यामुळे उदात्त हेतू ठेवून निघालेल्या भारत जोडो यात्रेला गटबाजीचे गालबोट लागण्यापेक्षा सेवाग्राम टाळलेलेच बरे, असा विचार तर झाला नसावा, अशी शंका एका नेत्याने उपस्थित केली.सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अविनाश काकडे म्हणतात की, राहुल गांधी यांनी प्रतिकात्मक म्हणून सेवाग्रामला येणे गरजेचे नाही. ते बरेचदा आश्रमात येऊन गेले आहे. थेट प्रश्नाला भिडून कार्यक्रम राबविणारा तो नेता असल्याचे माझे निरीक्षण आहे. मतांवर डोळा ठेवून यात्रा काढायची असती तर कदाचित सेवाग्रामही यात्रेच्या वाटेवर असते, असे उपरोधिक भाष्य काकडे करतात.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने