BCCI चं ठरलंय! ममतांनी पंतप्रधांनाना केलेल्या विनंतीला केराची टोपली

मुंबई :बीसीसीआयची बहुप्रतिक्षित सर्वसाधारण वार्षिक बैठक आज मुंबईत पार पडली. या बैठकीकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते. कारण या बैठकीत बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळणार होता. ठरल्याप्रमाणे भारताचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्ययपदी निवड झाली. बीसीसीआय अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्मसाठी इच्छुक असलेल्या सौरभ गांगुली अखेर अधिकृतरित्या पायउतार झाला. मात्र बीसीसीआयने सौरभ गांगुलीकडून फक्त पदच काढून घेतले नाही तर त्याच्या आयसीसीत पद या पर्यायाला देखील केराची टोपली दाखवली.



बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सध्याचे आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले यांना त्यांचे पद कायम राखण्यासाठी पाठिंबा देण्याचे ठरले आहे. त्यामुळे बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरभ गांगुली याची आयसीसीचा चेअरमन होण्याची इच्छा देखील बीसीसीआयने मान्य केली नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष घालण्याची विनंती केली होती. मात्र बीसीसीआयने या विनंतीला देखील केराची टोपली दाखवली असे दिसते.

आता बीसीसीआयचा आयसीसीमधील प्रतिनिधी कोण असणार हा एकच मुद्दा उरतो आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयचे सचिव जय शहा हे आयसीसीच्या बोर्ड मिटिंगला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने चेअरमन पदाच्या दुसऱ्या टर्मसाठी न्यूझीलंडच्या ग्रेग बार्कले यांना पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे जय शहा यांना बीसीसीआयमधील चेअरमनपदाची दुसरी टर्म मिळाली. आयसीसी चेअरमन ग्रेग बार्कले यांच्या दुसऱ्या टर्मसाठी देखील बीसीसीआय पाठिंबा देणार. फक्त सौरभ गांगुलीलाच दुसरी टर्म नाकारण्यात आली आहे.विशेष म्हणजे अरूण धुमल, राजीव शुक्ला हे देखील दुसऱ्या पदावर का होईना बीसीसीआयमध्ये पुन्हा कार्यरत असणार आहेत. आता सौरभ गांगुलीकडे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याशिवाय दुसऱ्या पर्याय दिसत नाहीये.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने