राज्यात १४२ महिलांच्या हाती स्टेअरिंग

कोल्हापूर : एसटी महामंडळाच्या सेवेत येण्यासाठी इच्छुक असलेल्या दीड हजार महिला उमेदवारांना टप्प्या-टप्प्याने सेवेत घेणे सुरू झाले. त्यानुसार राज्यभरात १४२ महिलांना एसटी महामंडळात ‘चालक तथा वाहक’ या पदावर नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे ५० आसण क्षमतेच्या अवजड बस गाड्या महिला चालविणार आहेत. त्यांचे प्रशिक्षण सध्या सुरू झाले असून येत्या दोन महिन्यांत या महिला चालक विविध मार्गावर प्रवासी वाहतूक करणार आहेत. यात कोल्हापुरातील दोन महिलांचा समावेश असून एका महिलेचे प्रशिक्षण सुरू आहे.

एसटी महामंडळात राज्यभरात जवळपास ७० हजार चालक वाहक प्रवासी सेवा देतात. १८ हजार गाड्यातून दिवसाकाठी ७० लाख प्रवासी वाहतूक होते. अपुऱ्या गाड्या, अपुऱ्या मनुष्यबळामुळे एसटीला सक्षम सेवा देताना कसरत होत आहे. अशा स्थितीत एसटी महामंडळाने २०१९ अंतर्गत चालक तथा वाहक पदाच्या भरती प्रक्रिया केली होती. यातील पात्र उमेदवारांपैकी २७ पुरुष उमदेवारांना नियुक्ती पत्र तर २२ महिलांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आले. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे या भरतीप्रक्रियेतील पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.


महिला सक्षमीकरणाचा भाग म्‍हणून महामंडळाने चालक तथा वाहक पद भरतीसाठी महिलांकडून अर्ज मागवले होते. यात २०३ महिला उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यातील १४२ महिला उमेदवारांनी अवजड वाहन चालविण्याचे परवानेही सादर केले. यातील २२ महिला उमेदवारांना सेवापूर्व प्रशिक्षणाचे पत्र नुकतेच मिळाले. एकूण ८० दिवसांचे सेवा पूर्व प्रशिक्षण सुरू झाले असून प्रशिक्षणपूर्ण होताच या महिला चालक तथा वाहक म्हणून प्रत्यक्ष कामगिरी बजावणार आहेत. यात कोल्हापुरातील दोन महिला एसटी चालक होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने