‘तारक मेहता…’ फेम दिशा वकानीला घशाचा कर्करोग? कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी सांगितलं सत्य, म्हणाले, “आवाज काढल्यामुळे…”

मुंबई :‘तारक मेहका का उल्टा चष्मा’ मालिकेचे आजही लाखो चाहते आहेत. या मालिकेमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानीने कार्यक्रमामधून एक्झिट घेतली. तरीही ती अजूनही दयाबेन या भूमिकेमुळे चर्चेत असते. आता एका वेगळ्याच कारणामुळे दिशा चर्चेत आली आहे. दिशाला घशाचा कर्करोग झाला असल्याची चर्चा आता पुन्हा एकदा रंगू लागली आहे. पण यामध्ये कितपत तथ्य आहे याबाबत अभिनेते दिलीप जोशी, निर्माते असित मोदी यांनी खुलासा केला आहे.



काय म्हणाले दिलीप जोशी?
दिशाला घशाचा कर्करोग झाला असल्याची बरीच चर्चा रंगत आहे. पण खरंच तिला या आजाराचा सामना करावा लागत आहे का? याबाबत ‘आजतक’ने दिलीप जोशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले “सकाळपासून दिशा वकानीला खरंच घशाचा कर्करोग झाला आहे का? याबाबत अनेक फोन येत आहेत. अनेक बातम्या माझ्या कानावर आल्या आहेत. मी फक्त एवढंच सांगेन की या सगळ्या अफवा आहेत. याकडे लक्ष देऊ नका.”

दिलीप जोशी यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर याबाबत ‘तारक मेहका का उल्टा चष्मा’चे निर्माते असित मोदी यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सोशल मीडियावर लाइक मिळवण्यासाठी अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. आवाज काढल्यामुळे नव्हे तर तंबाखू सेवनाने कर्करोग होतो. तसं पाहायला गेलं तर कित्येक लोक मिमिक्री करतात.”तसेच काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिशाने याबाबत भाष्य केलं होतं. “मला कधीच घशाच्या कर्करोगाचा सामना करावा लागला नाही. माझ्या आवाजाला आजपर्यंत कोणतं नुकसान पोहोचलं नाही.” असं दिशाने म्हटलं होतं. त्यामुळे दिशाला कर्करोग झाला असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता समोर आलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने