जवानांवर दगडफेक करणारे आता पंच आणि सरपंच झालेत; असं का म्हणाले अमित शहा?


नवी दिल्ली :
 पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या नेतृत्वाखाली ईशान्येकडील राज्ये, जम्मू-काश्मीर आणि नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा स्थिती गेल्या आठ वर्षांत सुधारली आहे, असं स्पष्ट मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांनी आज व्यक्त केलं.चाणक्यपुरी भागातील राष्ट्रीय पोलीस स्मारक (National Police Memorial) इथं ‘राष्ट्रीय पोलीस स्मृती दिना’च्या निमित्तानं वरिष्ठ पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांना संबोधित करताना शाह म्हणाले, 'ईशान्येत आम्ही सशस्त्र दलांना AFSPA अंतर्गत विशेष अधिकार दिले आहेत. या शिवाय, तरुणांनाही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. परिणामी, या भागातील हिंसाचार 70 टक्क्यांनी कमी झाला आहे.'


शहा पुढं म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील सध्याची स्थिती अशी आहे की, जे पूर्वी सुरक्षा जवानांवर दगडफेक करायचे ते आता 'पंच' आणि 'सरपंच' झाले आहेत. राज्यांतील शाळांमध्ये आता राष्ट्रगीत गायलं जात असून शाळांच्या इमारतींवर राष्ट्रध्वज फडकावला जात आहे. देशभरातील पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या बलिदानामुळंच भारत विकासाच्या मार्गावर पुढं जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जवानांना श्रद्धांजली वाहताना शाह म्हणाले, कोविड-19 या जागतिक महामारीदरम्यान जवानांनी प्रमुख भूमिका बजावली. 1959 मध्ये लडाखच्या हॉट स्प्रिंग्स भागात चिनी आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी प्राण गमावलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) 10 जवानांच्या स्मरणार्थ 'पोलीस स्मरण दिन' पाळला जातो. आज आपला देश प्रत्येक दिशेनं प्रगती करताना दिसत आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी देशभरातील पोलीस दल आणि CAPF च्या 35,000 हून अधिक जवानांनी आपले सर्वोच्च बलिदान दिलं आहे. त्यांच्या बलिदानाचं स्मरण करून संपूर्ण देश कृतज्ञ आहे. देशातील बहुतांश दहशतवाद प्रभावित ठिकाणं आज शांततेकडं वाटचाल करत आहेत. अनेक वर्षांपूर्वी सीआरपीएफनं चिनी सैन्याला धूळ चारली होती, त्याच दिवशी पोलीस स्मृती दिनाची प्रक्रिया सुरू झाली आणि ही प्रक्रिया आजतागायत सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने