रायगडमध्ये बंडखोरांची आमदारांची कोंडी करण्यासाठी ठाकरे यांची विरोधीपक्षांना रसद.

अलिबाग: बंडखोर आमदारांची मतदारसंघात कोंडी करण्यासाठी शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने विरोधी पक्षांना रसद पुरविण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत याची प्रचीती आली आहे.रायगड जिल्ह्यात शिववसेनेचे तीन आमदार बंडखोरी करत शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना उध्दव ठाकरे गटाची मोठी अडचण झाली. आमदारांसोबत बहुतांश पदाधिकारीही शिंदे गटात गेल्याने उध्दव ठाकरे गटाची ताकद क्षीण झाली आहे. कार्यकर्ते असले तरी नेतृत्वाचा आभाव ही समस्या ठाकरे गटाला भेडसावत आहे. ही बाब लक्षात घेऊन आता बंडखोर आमदारांची त्यांच्या मतदारसंघात कोंडी करण्याचे धोरण उध्दव ठाकरे गटाने स्वीकारले आहे. यासाठी पारंपारिक विरोधी पक्षांना रसद पुरवण्याचे काम शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून सुरू करण्यात आले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत याची प्रचीती आली.

शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या मतदारसंघात खरवली काळीज ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. यथाशक्ती मदतही केली. शिवसेनेच्या दोन गटातील फुटीचा काँग्रेसला चांगलाच फायदा झाला. घरच्या मैदानावर भरत गोगावले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. गोगावले यांनी आपले वास्तव्य असणारी ही ग्रामपंचात गमावली. त्यांचे दहा सदस्य निवडून आले. पण थेट सरपंच पदाचा उमेदवार पडला.अलिबाग मतदारसंघात वेश्वी आणि नवगाव ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या शेकापला पाठिंबा जाहीर केला. शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांची कोंडी व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. पण दळवी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन ग्रामविकास आघाडी स्थापन केली आणि शेकापचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या दोन्ही ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. शेकापला शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून मिळालेल्या पाठिंब्याचा फारसा फायदा या दोन्ही ठिकाणी झाल्याचे दिसून आले नाही. एकूणच ज्या ठिकाणी पक्षाची ताकद बंडखोरीमुळे क्षीण झाली आहे, त्या ठिकाणी विरोधी पक्षांना मदत करण्याचे धोरण शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाने स्वीकारल्याचे दिसून येत आहे.



आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही हाच पॅटर्न शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाकडून अवलंबिला जाणार आहे. वेळ पडल्यास पक्षाचे नुकसान झाले तरी बंडखोर आमदारांची मतदारसंघात कोंडी करायची असे निर्देश दिले जात आहेत. या भूमिकेतून काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आणि महाडच्या माजी आमदार स्नेहल जगताप यांनी नुकतीच उध्दव ठाकरे यांची भेट घेत जिल्ह्यातील आगामी निवडणुकांबाबत चर्चाही केली.

कशी असेल रणनीती

महाड मतदारसंघात शिवसेनेचा काँग्रेस हा पारंपरिक विरोधी पक्ष आहे. बंडखोर आमदार भरत गोगावले यांची कोंडी करण्याकरता ठाकरे गटाकडून काँग्रेसला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता आहे. अलिबागमध्ये शेकाप हा शिवसेनेचा प्रमुख विरोधी पक्ष आहे. तिथे महेंद्र दळवी यांची कोंडी करण्यासाठी शेकापशी जुळवून घेण्याचे धोरण ठाकरे गटाने अवलंबिले आहे. तर कर्जत खालापूर मतदार महेंद्र थोरवेंना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याची रणनीती उध्दव ठाकरे गटाने आखली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने