युक्रेनकडे जैविक अस्त्रे नाहीत; रशियाने केलेला आरोप अमेरिकेने फेटाळला

 न्यूयॉर्क : अमेरिकेच्या मदतीने युक्रेन जैविक अस्त्रांचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, या रशियाने केलेल्या आरोपांचा अमेरिका आणि इतर पाश्‍चिमात्य देशांनी आज इन्कार केला. जैविक अस्त्रांच्या वापराला आंतरराष्ट्रीय पातळीवर बंदी आहे. युक्रेनवरील हल्ले अधिक तीव्र करण्यासाठीच रशिया चुकीचे आरोप करत असल्याचा दावाही अमेरिकेने केला.



संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या आज युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत रशिया आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींमध्ये वाद झाला. युक्रेन आणि अमेरिका जैविक अस्त्रांचा वापर करण्याच्या प्रयत्नात असून हे आंतरराष्ट्रीय नियमांच्याविरोधात असल्याने त्याची चौकशी केली जावी, अशी मागणी रशियाच्या राजदूतांनी केली. रशियाने याबाबत ३१० पानी अहवालही सुरक्षा समितीच्या सदस्यांसमोर सादर केला. युक्रेनमध्ये अमेरिकेच्या मदतीने जैविक अस्त्रे तयार करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जात असल्याचा दावाही रशियाने केला आहे. सोव्हिएत महासंघाच्या विघटनासाठीही अमेरिकेने पूर्वी अनेक प्रयत्न केले होते, असाही दावा रशियाच्या राजदूताने यावेळी केला.

अमेरिकेने मात्र रशियाचे हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘रशियाच्या आरोपांवर चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालविण्यासारखे आहे. युक्रेनकडे जैविक अस्त्रे असल्याबाबत रशियाकडे छोटासाही पुरावा नाही. रशियाचे सैनिक युक्रेनमध्ये जनतेवर अनेक क्रूर अत्याचार करत असून त्यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत,’ असा दावा अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी केला. ब्रिटन, नॉर्वे, फ्रान्स यांनीही रशियाचे आरोप चुकीचे असल्याचे सांगितले.युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर करण्याची आमची इच्छा नाही. तशी आम्हाला गरजही वाटत नाही. अमेरिकेसह इतर देशांनी अणु हल्ल्याची धमकी दिल्यानेच त्यांना प्रत्युत्तर म्हणून आमची सज्जता दाखविण्यासाठी मी आधी अण्वस्त्रांच्या वापराबाबतचे विधान केले होते. जगावर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पाश्‍चिमात्यांनीच हा संघर्ष पेटवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने