१० नोव्हेंबरपासून पाचवी वंदे भारत ट्रेन धावणार आहे; असा असेल रूट.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. १३ ऑक्टोबर रोजी चौथ्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. आता १० नोव्हेंबरपासून देशामध्ये पाचवी वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.गुरुवारी हिमालच प्रदेश येथील ऊना रेल्वे स्थानकातून चौथ्या वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालीय. ही एक्स्प्रेस ट्रेन हिमाचलमधल्या अंब अंदौरा ते दिल्ली अशी धावेल. पंतप्रधानांच्या हस्ते गुरुवारी या ट्रेनचा शुभारंभ झाला, त्यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची उपस्थिती होती.



'एएनआय'ने दिलेल्या माहितीनुसार देशामध्ये आता पाचवी वंदे भारत ट्रेन सुरु होत आहे. ही ट्रेन चेन्नई-बंगळुरू-म्हैसूर अशी धावेल. येत्या १० नोव्हेंबर २०२२ पासून या ट्रेनचा शुभारंभ होईल.वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास जलदगतीने होण्यास मदत होत आहे. सध्या देशभरात चार वंदे भारत ट्रेन सुरु आहेत. यामध्ये २०१९ पासून दिल्ली ते वाराणसी ही ट्रेन सुरु आहे. तसेच दिल्ली ते कटरा, गांधीनगर ते मुंबई आणि दिल्ली ते अंब अंदौरा या गाड्यांचा समावेश आहे. आता देशात पाचवी वंदे भारत ट्रेन धावणार आहे.

दरम्यान, हिमालच प्रदेशमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्यापूर्वी ही ट्रेन सुरु करण्यात आल्याने तिला राजकीय महत्व प्राप्त झालेलं आहे. ही चौथी वंदे भारत एक्स्प्रेस हिमाचल ते दिल्ली अंतर पाच घंट्यांमध्ये पार करेल. त्यासोबत दिल्ली ते चंदीगड हे अंतर तीन तासांमध्ये कापता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने