Kolhapur : शाही दसरा सोहळ्याची तयारी सुरू

 कोल्हापूर : नवरात्रोत्सव आता सांगतेकडे निघाला असून, उत्सवातील उत्साह टिपेला पोहोचला आहे. देवीच्या जागरानिमित्त आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन झाले. उद्या (मंगळवारी) खंडेनवमीनिमित्त शस्त्रपूजन होणार असून, बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी झाली आहे. ऊस, लव्हाळा, झेंडूच्या फुलांसह पूजेच्या साहित्याला मागणी आहे. यंदा पावसामुळे झेंडूचा दर वाढला आहे. शंभर ते एकशे वीस रुपये किलोने झेंडूची विक्री झाली. दरम्यान, ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळ्याच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानीची आज विड्याच्या पानातील पूजा बांधण्यात आली.व्हाईट आर्मी, करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळातर्फे करवीर निवासिनी श्री अंबाबाईला परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी बुधवारी (ता. ५) भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. व्हाईट आर्मीतर्फे अंबाबाई मंदिर परिसरात सुरू असलेल्या वैद्यकीय साहाय्यता केंद्रात सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत हे शिबिर होणार आहे. त्याशिवाय गुरुवारी (ता. ६) स्थानिक भाविक, स्वयंसेवकांसाठी शिबिर होणार आहे. गेली काही महिने जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असून, तुलनेत रक्ताची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर हे शिबिर होणार असून, सर्वांनी रक्तदान करून श्री अंबाबाईची अनोखी सेवा करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.





टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने