कोल्हापुरात शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय संघर्ष सहकार क्षेत्रातही ; ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची गोकुळ संचालकपदाची नियुक्ती रद्द

 कोल्हापुर: मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे सरकारचे आधीचे शासन निर्णय रद्द करून राजकीय शह दिला आहे. पाठोपाठ त्यांनी सहकार क्षेत्रावरही लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. याचा पहिला प्रयोग त्यांनी राज्यातील सर्वात मोठ्या गोकुळ (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) या दूध संघात केला आहे.जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या प्रयत्नांवर मात करून जाधव यांनी गोकुळ वर संचालक म्हणून जाण्याचा प्रयत्न केला तरी तो अल्पायुषी ठरला. केवळ सव्वा वर्ष त्यांना संचालक मंडळात राहण्याची संधी मिळाली. जाधव यांचे संचालक पद जाण्यामागे शिवसेनेतील दोन गटातील सत्ता संघर्ष कारणीभूत असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. शिंदे गटाला पाठिंबा दिलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोर्चा काढून गद्दार लोकप्रतिनिधी अशा घोषणा दिल्या होत्या. तेव्हापासून जाधव हे त्यांच्यासाठी लक्ष्य ठरले होते. जाधव यांनी आता धैर्यशील माने यांच्यावर तोंडसुख घेत या गद्दार खासदाराला माजी खासदार करणार, असा इशारा दिला असल्याने शिवसेनेतील वाद पुन्हा तापला आहे.जाधव यांची निवड रद्द झाल्याने रिक्त पदासाठी शिंदे – फडणवीस यांच्या जिल्ह्यातील समर्थकांनी हालचाली चालवल्या आहेत. धैर्यशील माने यांनी मित्र झाकीर भालदार यांची निवड होण्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना दिले आहे. खासदार मंडलिक यांनी पुन्हा एकदा पुत्र रोहित यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याकडून अरुण इंगवले यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. प्रमुख नेत्यांनी आपल्या समर्थकास मलईदार संचालकपद मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असल्याने यात कोणाची सरशी होणार याकडे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने