रस्त्यांची गुणवत्ता कागदोपत्रीच

कोल्हापूर : जो रस्ता करणार त्यावरच साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करून आणण्याची जबाबदारी सोपवली जात असल्याने शहरातील रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न आवासून उभा राहिला आहे. तपासणी झालेला एक कागद पुरेसा असून, त्यावर लाखो, करोडोंचे काम केले जाते. चाचणीसाठी वेगळे व वापरणारे दुसरेच साहित्य वापरले गेल्यास त्याचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही थांगपत्ता लागत नाही. यातच पावसात रस्ता कसा धुवून जाऊ शकतो या प्रश्‍नाचे उत्तर सामावले आहे. त्यामुळे निधीची कमतरता असल्याचे सांगणाऱ्या महापालिकेच्या यंत्रणेने यापुढे डोळे सताड उघडे ठेवून कामावर लक्ष ठेवण्याची वेळ आली आहे.



शहरात प्रचंड पाऊस पडत आहे, पूर येत आहे. अशा कारणांनी रस्ते खराब झाल्यास ही कारणे नागरिक समजू शकतात, पण मुळातच साहित्यात गुणवत्ता नसेल तर ते रस्ते टिकणारच नाहीत. दोन वा तीन वर्षांच्या वॉरंटी कालावधीत रस्ते खराब होण्यास हेही एक कारण ठरत आहे. दरवर्षाला पॅचवर्क तसेच काही नवीन रस्त्यांसाठी निधी मंजूर करायचा. त्याची निविदा झाली की तो रस्ता कसा केला जात आहे, हे पाहण्यासाठी वरिष्ठ नव्हे, संबंधित विभागातील अधिकारी कधी फिरती करतात का, हा प्रश्‍नच आहे.कामासाठी ज्या काही अटी शर्थी असतात त्यात ठेकेदाराने साहित्याची गुणवत्ता तपासून घ्यावी, हीही एक असते. त्यासाठी महापालिकेची यंत्रणा ठेकेदाराला पत्र देते. त्यानुसार तो ठेकेदार सरकारी वा अधिकृत प्रयोगशाळेतून तपासणीचे पत्र आणतो. ते कामाच्या कागदपत्रात जोडले की झाले, ही बाब महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

गुणवत्तेची चाचणी इतकी पातळ झाली आहे. ठेकेदार कोणते साहित्य देतो, हे महापालिकेच्या यंत्रणेला माहिती नसते वा त्याची काळजी केली जात नाही. त्यामुळे चाचणी केलेल्या साहित्याप्रमाणेच रस्त्यासाठी साहित्य वापरले जात असेल ही अजिबात खात्री नाही. सरकारच्या अधिकृत प्रयोगशाळेकडून गुणवत्ता तपासून आणण्यासाठी डांबर तसेच मिक्स साहित्य ठेकेदारांकडून दिले जाते. त्यांचे पत्र झाल्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू असताना वापरले जात असलेले साहित्य त्या दर्जाचे आहे की नाही, हे महापालिकेच्या यंत्रणेने रस्त्यावर जाऊन अचानक तपासायला हवे. त्यातून ठेकेदाराचे पितळ उघडे पडू शकते, पण हा सतर्कपणा दाखवल्याचे आजतागायत महापालिकेतून कानावर आलेले नाही. रस्ते टिकवायचे असतील तर गटर, विभागातील समन्वय यासारख्या बाबींबरोबरच गुणवत्ता तपासणेही गरजेचे आहे.

त्रयस्थ यंत्रणा पचनी पडत नाही

नगरोत्थान योजनेतील रस्ते केले जात असताना त्रयस्थ यंत्रणा गुणवत्ता तपासण्यासाठी नेमली होती. ती रस्त्यावर जाऊन साहित्य तपासत होती. त्यामुळे ठेकेदारांना कामाच्या ठिकाणी गुणवत्तेचेच साहित्य वापरावे लागत होते. त्याचा त्रास होत असल्याने काहींच्या मदतीने या यंत्रणेला हेतुपुरस्सर त्रास कसा होईल, हे पाहिले गेले. त्यातून ती कंपनी गेली. यामुळे मोकळे झालेले रान नियमाच्या चौकटीत बसवण्याची जबाबदारी प्रशासकांनी घ्यायला हवी, असे मत काही तज्ज्ञ व्यक्ती व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने