“व्यायामामुळे नाही तर प्रोटीन पावडर…” जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू होण्याबाबत सुनील शेट्टीचं वक्तव्य

मुंबई : जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू ओढावण्याचं प्रमाण वाढत आहे. गेल्याच आठवड्यात अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशीचा जिममध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. याआधीही कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव, सलमान खानचा बॉडी डबल असलेल्या सागर पांडे व दाक्षिणात्य अभिनेता पुनीत कुमारचंही याच कारणामुळे निधन झालं. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीला याबाबत मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला.



सुनील शेट्टी बॉलिवूडमधील तंदुरुस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतो. एम एक्स प्लेअरवरील धारावी बॅंक या त्याच्या वेब सीरिजमुळे तो चर्चेत आहे. याच वेब सीरिजनिमित्ताने त्याने ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला “जीममध्ये व्यायाम करत असताना किंवा केल्यानंतर मृत्यू होण्याचं प्रमाण वाढत आहे, असं का?”, असा प्रश्न विचारण्यात आला.सुनील शेट्टी या प्रश्नाला उत्तर देत म्हणाला, “व्यायाम केल्यामुळे मृत्यू होऊ शकत नाही. प्रोटीन पावडर किंवा सप्लिमेंट्स हे मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतं. स्टेरॉइड व सप्लिमेंट घेतल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने नाही तर हृदय काम करणं बंद करतं आणि मृत्यू ओढवतो”.

योग्य आहार घेणे आणि त्याबरोबर पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे शरीरावर परिणाम होतात. डाइट करणे म्हणजे योग्य आहार घेणे नव्हे. पोषक तत्त्वे आहारातून तुमच्या शरीराला मिळाली पाहिजेत”, असंही सुनील शेट्टी म्हणाला. सुनील शेट्टी धारावी बॅंक वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १९ नोव्हेंबरला ही सीरिज एम एक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने