कर्णधारही हतबल; रोहितच्या खास दोस्ताला कसोटी संघातून कायमचा डच्चू?

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप मध्यापर्यंत पोहचतो ना पोहचतो तोच भारतीय निवडसमितीने न्यूझीलंडविरूद्धच्या टी 20 आणि बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेच्या संघाची घोषणा केली. निवडसमितीने न्यूझीलंड दौऱ्यासाठी सध्या टी 20 वर्ल्डकप खेळत असलेल्या संघात अनेक बदल केले आहेत. याचबरोबर कसोटी संघातही जुन्या चहऱ्यांना स्थान मिळालेले नाही. न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेतील टी 20 संघात रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक या दोन अनुभवी खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. तर भारताचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला देखील कसोटी संघात स्थान मिळालेले नाही.चेतेश्वर पुजाराप्रमाणेच अजिंक्य रहाणे देखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला गेलेला फॉर्म परत आणून संघात पुनरागमन करेल असे वाटत होते. मात्र अजिंक्यचा धावांचा दुष्टाळ अजून काही संपलेला नाही असे दिसते. दुसरीकडे युवा खेळाडू कसोटी संघातील मधल्या फळीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आपली दावेदारी प्रबळ करत आहेत.



मुंबईकर अजिंक्य रहाणे हा सध्याचा भारतीय संघाचा तीनही क्रिकेट फॉरमॅटमधील कर्णधार रोहित शर्माचा जवळचा मित्र आहे. रोहित कर्णधार असताना देखील अजिंक्य रहाणेला कसोटी संघात स्थान मिळवण्यात अपयश येत आहे. दुसरीकडे टी 20 संघातून देखील दोन दिग्गजांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. 18 नोव्हेंबरपासून न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली. संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. यावरून टी 20 वर्ल्डकपनंतर हार्दिक पांड्या टी 20 संघाचे नेतृत्व हातात घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुलने वैयक्तिक कारणाने ब्रेक घेतला आहे. याचबरोबर या संघात अश्विन आणि दिनेश कार्तिक यांचा देखील समावेश करण्यात आलेला नाही. या निर्णयानंतर आता निवड समिती या दोन अनुभवी खेळाडूंचा भारताच्या भविष्यातील टी 20 संघासाठी विचार करणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. रोहितच्या आग्रहास्तव या दोघांनी टी 20 वर्ल्डकप संघात वर्णी लागली होती.निवडसमिती अध्यक्ष चेतन शर्मा याबाबत मत व्यक्त करताना म्हणाले की, 'मालिकेपूर्वीच काही दिवस आधी वर्ल्डकप संपणार आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना विश्रांती द्यायची आणि कोणत्या नाही याबाबत आम्हाला विचार करावा लागणार होती. दिनेश कार्तिक चांगली कामगिरी करत आहे. आमच्यासाठी तो उपलब्ध आहे. मात्र वर्ल्डकपनंतर आम्ही दुसऱ्या खेळाडूंना देखील चाचपून पहाण्याचा विचार केला.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने