मानवी चांद्रमोहिमेच्या दिशेने पाऊल...

अमेरिका: नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन’(नासा) या अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने अपोलो मोहिमेच्या ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा मानवी चांद्रमोहिमेच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकले आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा पहिला टप्पा आणि पूर्वतयारीसाठी अर्टिमिस-वन मोहिमेअंतर्गत ओरायन अंतराळयान बुधवारी दुपारी पावणेबाराच्या (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुमारास चंद्राकडे झेपावले.

‘नासा’च्या मंगळ मोहिमेनंतर अर्टिमिस -वन ही सर्वांत महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. ‘नासा’ याद्वारे ओरायन अंतराळयान चंद्रावर उतरविणार आहे. हे यान २६ दिवस चंद्राच्या कक्षेत मुक्काम करून पुन्हा पृथ्वीवर परतणार आहे. फ्लोरिडातील केनेडी अवकाश केंद्राच्या ३९बी या तळावरून स्पेस लाँच सिस्टिम रॉकेट (एसएलएस) आणि ओरायन यान यांचे प्रथमच एकत्रितपणे प्रक्षेपण करण्यात आले. ‘अर्टिमिस-वन’चा हा तिसरा प्रयत्न होता. याआधी दोन वेळा इंधन गळतीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते.वादळासारख्या नैसर्गिक संकटांमुळेही या महाकाय रॉकेटच्या उड्डाणाला विलंब झाला होता. आजही ऐतिहासिक उड्डाणापूर्वी इंधन गळतीची समस्या निर्माण झाली होती. पण विशेष निपुण असलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने दुरुस्ती केली. याचप्रमाणे उड्डाणतळाचीही दुरुस्ती केल्यानंतर संपूर्ण फ्लोरिडात ऐकू येईल अशी गर्जना करीत ‘एसएलएस’ रॉकेटने आकाशात झेप घेतली. यावेळी ज्वाळांच्या प्रकाशाने परिसर प्रकाशमान झाला होता.





‘अर्टिमिस-वन’ची गरज

  • या मोहिमेत ओरायन आणि एसएलएस रॉकेट चंद्रापर्यंत पोहोचून पुन्हा पृथ्वीवर परतेल

  • या प्रवासात दोन्ही शक्तीशाली साधनांची क्षमता तपासता येणार आहे

  • भविष्यातील मानवी चांद्रमोहिमेपूर्वीची ही चाचणी असेल

  • जर ही मोहीम यशस्वी झाली तर २०२५पर्यंत अर्टिमिस मोहिमेद्वारे प्रथमच अंतराळवीर चंद्रावर उतरतील

  • अर्टिमिस-वन मोहिमेनंतर ‘चंद्रावर जाण्यासाठी नासा’चे शास्त्रज्ञ आणखी आवश्‍यक तंत्रज्ञान विकसित करतील

  • चंद्रानंतर मानवी मंगळ यात्रेसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल

ओरायन अंतराळ यानाची वैशिष्ठ्ये

  • जगातील सर्वांत ताकदवान आणि मोठ्या रॉकेटच्या वरील भागात ओरायन अंतराळयान आहे

  • मानवाला अंतराळात प्रवास करण्‍यासाठी यानाची निर्मिती

  • आतापर्यंत कोणतेही अंतराळ यान पोहोचू शकले नाही एवढे अंतर हे यान कापणार

  • यान पृथ्वीवरून चंद्रापर्यंत ४.५० लाख किमी प्रवास करेल

  • त्यानंतर चंद्राच्या न दिसणाऱ्या भागाच्या दिशेने ६४ हजार किमी प्रवास करेल

  • आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशिवाय एवढे अंतर कापणारे ओरायन हे पहिलेच अंतराळ यान आहे

परतीच्या प्रवासात ओरायनचा वेग

  • पृथ्वीवर परतण्यापूर्वी यानाचा वेग ४० हजार किमी प्रतितास असेल

  • कक्षेत आल्यानंतर त्याचा वेग ४८० किमी प्रतितास होणार

  • कक्षेत आल्यानंतर ओरायनला साधारण दोन हजार ८०० अंश सेल्सिअस तापमान सहन करावे लागेल

  • येथेच त्याच्या ‘हिटशील्ड’ची चाचणी होईल

  • समुद्रापासून २५ हजार फूट उंचीवर यानाची दोन पॅराशूट उघडतील

  • ओरायनचा वेग कमी होऊन १६० किमी प्रतितास होईल

  • त्याचे मुख्य तीन पॅराशूट खुले होतील

  • यानंतर गती प्रतितास ३२ किमी होईल

  • सॅन डिएगोजवळ प्रशांत महासागरात यान उतरेल

यान पृथ्वीवर उतल्यानंतर

  • यान उतरण्यापूर्वी नासाच्या ‘एक्सप्लोरेशन ग्राउंड सिस्टिम’चे उड्डाण आणि बचाव पथक प्रशांत महासागरात तैनात

  • ओरायन समुद्रात उतरल्यानंतर ते नौदलाच्या पाणबुडीवर आणणार

  • नौदलाचे पाणबुडे आणि अन्य अभियंते यान पाणबुडीला बांधून ठेवतील

  • यान पुन्हा केनेडी अवकाश केंद्रात नेले जाईल. तेथे त्याची तपासणी करण्यात येईल

अर्टिमिस - वन मोहीम

  • उड्डाण तळ : फ्लोरिडामधील केनेडी अवकाश केंद्रावरील ३९बी तळ

  • मोहिमेचा कालावधी : २५ दिवस, ११ तास, ३६ मिनिटे

  • प्रवासाचे एकूण अंतर : २० लाख ९२ हजार १४७ किलोमीटर

  • पोहचण्याचे ठिकाण : चंद्राच्याबाहेरील रेट्रोग्रेड कक्षा

  • पुनर्प्रवेशाचा वेग : प्रतितास ३९, ४२२ किलोमीटर

  • पृथ्वीवर परतण्याचा दिवस : ११ डिसेंबर २०२२

  • जमिनीवर उतरण्याचे ठिकाण : प्रशांत महासागरात सॅन डिएगोजवळ

जगातील शक्तीशाली रॉकेट ‘एसएलसी’

  • पाच टप्प्यातील बूस्टरद्वारे उड्डाण

  • यामधील चार टप्प्यात ‘आरएस २५’ हे इंजिन आहे

  • आरएस २५’ हे इंजिन अत्याधुनिक आणि शक्तिशाली आहे

  • पृथ्वीच्या कक्षेबाहेर ९० सेकंदात पोहचण्याची क्षमता

ओरायनचे चांद्रभ्रमण

  • चंद्राच्या सर्वांत जवळ ९७ किमी आणि सर्वांत दूर ६४ हजार किमीपर्यंत प्रवास करणार

  • मानवाने मानवासाठी तयार केलेले हे यान अंतराळात प्रथमच एवढ्या दूरपर्यंत जाणार

  • चंद्राला दुसरी प्रदक्षिणा घातल्यानंतर ओरायन इंजिन सुरू करेल

  • चंद्राच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर येत पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू करणार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने