“गरिबाच्या पोरीचं प्रेम म्हणजे ती पळाली अन् श्रीमंताच्या पोरीचं प्रेम म्हणजे…”, शरद पवारांचं नाव घेत बच्चू कडूंची टोलेबाजी

मुंबई :  बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्यात मागील काही दिवसांपासून संघर्ष सुरू होता. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. दरम्यान, आज बच्चू कडूंनी अमरावती येथे शक्तीप्रदर्शन करत जोरदार टोलेबाजी केली आहे. गुवाहाटाली गेलेल्या आमदारांवर केल्या जाणाऱ्या टीकेलाही आमदार कडूंनी प्रत्युत्तर दिलं आहे.“राजकारण हे राजकारणासारखं करावं लागेल आणि तत्त्व हे तत्त्वांसारखी पाळावी लागतील. या दोन्ही गोष्टींची सांगड घालावी लागेल. केवळ तत्त्व पाळत राहिलो आणि काम काहीच केलं नाही, तर त्या तत्त्वांना किंमत उरत नाही. लोकांच्या दु:खावर कुठेतरी मलमपट्टी करता आली पाहिजे. आम्ही उगीच गुवाहाटीला गेलो नाही. तेव्हा मी राज्यमंत्री होतो. मंत्री असतानाही मला गुवाहाटीला जाण्याची गरज काय होती. मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभा राहिलो, तो घटक महत्त्वाचा आहे” असं बच्चू कडू आपल्या भाषणात म्हणाले.



पुढे बच्चू कडू आपल्या भाषणात म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३८ मध्ये कॉग्रेसला ‘जळतं घर’ म्हटलं होतं. काँग्रेसशी मैत्री म्हणजे ‘मुंगूस आणि सापाची’ मैत्री असंही ते म्हणाले होते. तरीही बाबासाहेबांची तत्त्व महत्त्वाची होती. राजकारणात आलटापालट होऊ शकते. पण मी ज्या शेवटच्या घटकासाठी उभं राहिलो तो घटक महत्त्वाचा आहे. त्याचं खरं स्वातंत्र महत्त्वाचं आहे. ही सगळी सत्ता त्या वंचितांपर्यंत नेण्याचं काम महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांना ‘जळतं घर’ म्हटलं त्यांच्यासोबतच बाबासाहेब बसले आणि संविधान समितीचे सदस्य झाले. यानंतर त्यांनी घटना तुमच्या हाती दिली. निर्णय कडू असले तरी काम गोड करता आलं पाहिजे”

“शिवाजी महाराजांनी तर कित्येकदा तह केले. माझ्या शेतकऱ्यांच्या पिकाच्या देठालाही हात लागता कामा नये, या भावनेतून जेव्हा छत्रपतींनी म्यानातून तलवार बाहेर काढली, तेव्हा त्यांनी तत्त्वांशी कुठेही तडजोड केली नाही. कधी आदिलशहा तर कधी मुघलांनासोबत घेऊन महत्त्वाचं ध्येय साध्य केलं. याला तुम्ही बंडखोरी म्हणता का? हा उठाव आहे. शरद पवारांनी २०१४ मध्ये भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला. तो त्यांच्यासाठी सोयीचा होता. पण तेव्हा कुणीही बोललं नाही. गरिबाच्या पोरीनं प्रेम केलं तर ती पळाली आणि श्रीमंताच्या पोरीनं प्रेम केलं तर त्यांचं ‘लव्ह मॅरेज’… आमचाही उठाव होता, हम छोटे हैं लेकीन दिलदार है” अशा शब्दांत बच्चू कडूंनी टोलेबाजी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने