गावसकर म्हणतात, भारत जिंकला नाही तर बांगलादेश हरलं!

मुंबई : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये सुपर 12 च्या ग्रुप 2 मधील सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांवी पराभव केला होता. भारताने प्रथम फलंदाजी करत 184 धावा केल्या. मात्र त्याचा पाठलाग करताना बांगलादेशने 7 षटकात नाबाद 66 धावा करून भारताचे टेन्शन वाढवले होते. लिटन दासने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती. मात्र सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. खेळ थांबला त्यावेळी बांगलादेश डकवर्थ लुईस नियमानुसार विजयी होणार होता.दरम्यान, 50 मिनिटांनी सामना सुरू झाला आणि डीएलएस नियमानुसार बांगलादेशला नवे टार्गेट देण्यात आले. भारताने पावसाच्या व्यत्ययानंतर जोरदार पुनरागमन करत सामना 5 धावानी जिंकला. याबाबत भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या स्टाईलमध्ये वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधले.



सुनिल गावसकर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले की, 'पाऊस येण्यापूर्वी बांगलादेश 7 षटकात बिनबाद 66 धावांवर होते. ते त्यावेळी प्रति षटक 9 धावा आरामात करत होते. त्याच्या हातात 10 विकेट्स होत्या. त्यानंतर अचानक टार्गेट 33 धावांनी कमी झाले. इथेच बांगलादेश भांबावले. मात्र आवश्यक धावगती जेव्हा त्यांनी डावाची सुरूवात केली होती तेव्हा जितकी होती तिकतीच आताही होती.'गावसकर पुढे म्हणाले की, 'स्मार्ट क्रिकेट खेळण्याऐवजी ते प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा प्रयत्न करू लागले. ते शॉर्ट स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने फटके खेळू लागले. भारतीय गोलंदाजांनी हुशारीने गोलंदाजी करत त्यांना मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर झेल देण्यात भाग पाडले. जे फटके सीमारेषेच्या बाहेर जायला हवे ते लाँग ऑन आणि डीप मिड विकेटवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांच्या हातात विसावू लागले.'

दरम्यान, बांगलादेश का हरले हे सांगता सांगता सुनिल गावसकर यांनी निर्मला सीतारमण यांच्यासारखे वक्तव्य केले. ते म्हणाले की, 'मी असे म्हणेन की भारताने सामना जिंकला नाही तर बांगलादेशने सामना गमावला. भारताने स्वतःवर नियंत्रण ठेवले मात्र बांगलादेशचे खेळाडू भांबावले. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. जर त्यांनी स्मार्ट क्रिकेट खेळले असते तर, दुहेरी धावांवर भर दिला असता तर त्यांनी षटकात 10 धावा आरामात केल्या असत्या. त्यांना त्याच पद्धतीने खेळण्याची गरज होती.'ग्रुप 2 मध्ये सध्या भारत 6 गुण घेऊन अव्वल स्थानावर आहे. भारताने सेमी फायनलचे तिकिट जवळपास निश्चित केले आहे. जर ते रविवारी झिम्बाब्वेविरूद्धचा सामना जिंकतात तर ते ग्रुप टॉप करत सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश करतील.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने