मागच्या वेळी भाजपला घाम फोडणाऱ्या 'काँग्रेस'ची जागा 'आप' घेतंय का?

गुजरात: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकांकडे लागलं आहे. २०१७मध्ये काँग्रेसने भाजपला चांगलीच टक्कर दिली होती. मात्र यावेळी काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. कारण पंजाब जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाने गुजरात निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे भाजप-काँगेस-आप अशी तिरंगी लढत गुजरामध्ये होईल, असं चित्र आहे.निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत आज घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. १ आणि ५ डिसेंबरला गुजरात निवडणूक पार पडणार आहे. तर ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्यात ८९ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. तर दुसऱ्या टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. एकूण १८२ जागांवर निवडणूक होणार आहे.




२०१७मध्ये अशी झाली टक्कर

गुजरातेतल्या विधानसभेच्या १८२ जागांमध्ये बहुमतासाठी ९२ जागांची गरज असते. २०१७मध्ये भाजपने ९९ जागांवर विजय मिळवला होता. तर काँग्रेसने ७७ जागांवर. ६ जागांवर अपक्षांनी बाजी मारलेली.

कुठल्या विभागात किती मतदारसंघ?

मध्य गुजरातमध्ये ६८ जागा आहेत. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ५४, उत्तर गुजरातमध्ये ३२ आणि दक्षिण गुजरातमध्ये २८ विधानसभा मतदारसंघ आहेत.

कोणाचं किती संख्याबळ?

  • २०१७मधील निवडणुकीत मध्य गुजरातच्या ६८ पैकी ४० जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर काँग्रेसचा २४ जागांवर विजय झाला होता. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यात ४ जागा पडल्या होत्या.

  • कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये काँग्रेस भाजपपेक्षा पुढे होता. ५४ पैकी ३० जागांवर काँग्रेस तर २३ जागांवर भाजपने विजय मिळवलेला. तर एक आमदार अपक्ष म्हणून निवडून आलेला होता.

  • उत्तर गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमधली रणधुमाळी भलतीच गाजली. येथील ३२ पैकी १७ विधानसभेच्या जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. तर १४ जागा भाजपच्या खात्यात पडल्या. एका जागेवर काँग्रेस पुरस्कृत जिग्नेश मेवाणी विजयी झाले होते.

  • दक्षिण गुजरातमध्ये भाजपने एकतर्फी विजय मिळवला होता. या भागातल्या २८ मतदारसंघांपैकी २२ जागांवर भाजपने वर्चस्व सिद्ध केलं. उर्वरित ६ जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या होत्या.

२०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला घाम फोडला होता. यावेळी आम आदमी पक्षाची एन्ट्री झालेली आहे. दिल्लीचे आप सरकारमधील मंत्री, पक्षाचे मोठे नेते मागील काही दिवासांसून गुजरातमध्ये तळ ठोकून आहेत. शिवाय पंजाबमधील मोठे नेते नेहमी गुजरात दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे काँग्रेसची स्पेस 'आप' खाणार का? हाच खरा प्रश्न आहे. कारण गुजरातमध्ये काँग्रेसने म्हणावी तशी तयारी सुरु केल्याचं दिसत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने