“निवडणूक आयोगाने तीन माकडांची चित्रं लावलीयेत”, निष्पक्षतेवरून काँग्रेसच्या आरोपाला मुख्य निवडणूक आयुक्तांचं उत्तर, म्हणाले…

दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. यावेळी त्यांना देशातील प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसने आयोगाच्या निष्पक्षतेवर निशाणा साधत तीन माकडांच्या चित्राच्या टीकेबाबतही विचारणा करण्यात आली. यावर राजीव कुमार यांनी काँग्रेसच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलंय. ते गुरुवारी (३ नोव्हेंबर) दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.राजीव कुमार म्हणाले, “आमच्या कृती आणि निकाल कोणत्याही शब्दांपेक्षा अधिक बोलक्या आहेत. मी तुम्हाला बोलून कितीही समजून सांगण्यापेक्षा आमच्या कृती आणि निकाल योग्य आहेत की नाही हे जास्त महत्त्वाचं आहे. निवडणुकीचे निकाल योग्य नाही असं म्हणणं भारतीय मतदारांचा खूप मोठा अपमान आहे. 



“निकालानंतर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पश्चाताप”

“देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक निवडणुका झाल्यात. मोठ्या प्रमाणात विधानसभा निवडणुका झाल्या. यात ज्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली त्यांना आश्चर्यकारक निकाल पाहायला मिळाले. ज्या पक्षाने किंवा उमेदवाराने काही प्रश्न उपस्थित केले, तेव्हा निकाल आल्यानंतर त्यांना असे प्रश्न उपस्थित करायला नको होते असं वाटलंय. कारण त्यांच्या बाजूने निकाल आले आहेत,” असं मत राजीव कुमार यांनी व्यक्त केलं.

“…तेच ईव्हीएम आरोप करणाऱ्या पक्षांना जिंकून देतात”

राजीव कुमार पुढे म्हणाले, “आम्ही अशा अनेक घटना सांगू शकतो. निवडणूक सुरू होण्याआधी लांबलचक पत्रे येतात आणि ईव्हीएम मशीन खराब आहेत, ते बदला अशी तक्रार येते. तेच ईव्हीएम आरोप करणाऱ्या पक्षांना जिंकून देतात. त्यानंतर ते प्रश्न उपस्थित करणं बंद होतं. त्यानंतर ते निकाल स्वीकारले जातात.”

“निवडणुकीआधी आयोगाविषयी नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातं”

“निवडणूक आयोगाची मोठी परंपरा आहे. आयोग आज निर्माण झालेला नाही. आतापर्यंत जेवढे निकाल देण्यात आलेत त्याचीच ही ताकद आहे. काही दिवसांपूर्वीच ईव्हीएमवर एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली आणि त्यात भारतीय निवडणूक आयोगालाही बोलावण्यात आलं होतं. जगभरात निवडणूक आयोगांविषयी निवडणुकीआधी नकारात्मक वातावरण निर्माण केलं जातं. त्याची आम्हाला कल्पना आहे,” असं राजीव कुमार यांनी म्हटलं.

“सामना हरल्यानंतर पराभूत संघ पंचांनाही दोष देतो”

“क्रिकेटमध्ये सामना हरल्यानंतर पराभूत संघ पंचांनाही दोष देतो. इथं तर कोणीही थर्ड अंपायर नाही ज्याच्याकडे आपण बॉल टू बॉल पाहू शकू. मात्र, निवडणुकांचे निकाल हाच निष्पक्षतेचा सर्वात मोठा पुरावा आहे. हा आधीच्या सर्व निवडणूक आयुक्तांनी निर्माण केलेला आमचा वारसा आहे. आम्ही हा वारसा असाच पुढे नेऊ,” असंही राजीव कुमार यांनी नमूद केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने