''सत्तारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अजित पवारांनी भाष्य करण्याची गरज नाही''

मुंबई : काही दिवसांपासून वारंवार आक्षेपार्ह विधाने करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना पुन्हा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांच्या या व्यक्ताव्यानंतर राज्यभर संताप उफाळला व सत्तार यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होत मुंबई, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली. मुंबईतील सत्तार यांच्या शासकीय बंगल्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली घराच्या काचा फोडल्या. तर दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने पोलिस महासंचालकांना पत्र लिहून सत्तार यांच्या विधानाप्रकरणी कायदेशीर कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे सांगितले आहे.




याबाबत सुळे यांच्या कुटुंबातील आमदार रोहित पवार, सदानंद सुळे, स्वत: सुप्रिया सुळे यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली परंतु याबाबत विरोधी पक्षनेते आणि सुप्रिया सुळे यांचे भाऊ अजित पवार यांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्याने पुन्हा एकदा अजित पवार चर्चेचा विषय ठरले आहेत. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या व्यक्तव्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांना बडतर्फ करा अशी मागणीही राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत असताना पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला की, या संपूर्ण घटनेबाबत अजित पवार यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, अजित पवारांनी भाष्य करण्याची गरज नाही ते त्यांच्या आजोळी काही कारणास्तव गेले आहेत आणि त्यांच्या बहिणीविषयी कोणीतरी आक्षेपार्ह बोलणं यांवर त्यांनी भाष्य करण्याची गरज नाही तसेच अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा करू नका असंही यावेळी जयंत पाटील म्हणालेत.

अशातच आता अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या व्यक्तव्याबाबत राष्ट्रवादीच्या वकिलांकडून विधानसभाध्यक्ष आणि लोकसभाध्यक्ष यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे.दरम्यान या संदर्भात जयंत पाटील बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा. अब्दुल सत्तार यांना लवकरात लवकर बडतर्फ करावं. यापूर्वीही त्यांनी अशी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. मंत्रिमंडळातील लोकांनी याचं भान राखल पाहिजे. आपली संस्कृती अशी नाही. कितीही कट्टर विरोधक असलो तरी बोलण्याच भान असलं पाहिजे. त्यांना बडतर्फ करण्यापर्यंत आम्ही ही मागणी लावून धरू असंही जयंत पाटील म्हणालेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने