मला पदवी दिली, या लायकीचा मी आहे की नाही हा प्रश्न आहे; असं का म्हणाले गडकरी?

औरंगाबाद : मराठवाडा विद्यापीठ ही संतांची भूमी आहे. हे विद्यापीठ एक प्रकारचं नॉलेज पॉवर सेंटर आहे. सामाजिक, आर्थिक परिवर्तनासाठी काय केलं पाहिजे, शिक्षणामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि या भागातल्या सर्वांनी आर्थिक विकासाकरता काय केलं पाहिजे याचं व्हिजन विद्यापीठाकडून अभिप्रेत आहे. मला विश्वास आहे की, विद्यापीठ नक्कीच मराठवाड्याच्या इतिहासामध्ये एक प्रगतीशील, समृद्ध आणि संपन्न ठरेल, असं मत मंत्री नितीन गडकरी  यांनी व्यक्त केलं.



ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होते. यावेळी मंत्री नितीन गडकरींचा डी. लिट पदवी देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यपालांसह शरद पवार  उपस्थित होते. गडकरी म्हणाले, विद्यापीठानं जालन्यामध्ये विविध कोर्सेस सुरू केले तर नक्कीच याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल. जे इथले शेतकरी आहेत, त्यांना समृद्ध-संपन्न करण्याकरता अन्नदाताबरोबर ते ऊर्जादाता झाले पाहिजेत, असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. पवार साहेब यात खूप काम करत असतात, त्याशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. मी पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये 36 तलाव बांधले आणि त्यामुळं जवळपास 80 गावांतला दुष्काळ संपला आहे. म्हणजेच, धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा.. चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात, असा उपक्रम करा. मला विश्वास आहे की, या विद्यापीठाचे फार मोठे योगदान सामाजिक, आर्थिक परिवर्तनामध्ये नक्कीच मिळेल.

मराठवाड्यात जन्माला आलेले समर्थ रामदास म्हणायचे की, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे त्यामुळं ही चळवळीची, विकासाची दिशा ज्ञानाच्या आधारावर आपल्या भविष्यातल्या पिढीला द्यायची आहे. मी पुन्हा एकदा विद्यापीठाचं मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे जी पदवी आपण मला दिली, याकरता मी लायकीचा आहे की नाही हा खरा प्रश्न आहे. मी अतिशय सामान्य विद्यार्थी आहे. पण, मला संधी मिळाली. मी नेहमी म्हणायचो की ज्ञानापेक्षा आणि टेक्नॉलॉजी पेक्षा इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात प्रत्यक्षात हे परिवर्तन घडवण्याची ताकद आपल्यात असणं गरजेचं आहे. त्यामुळं नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे व्हा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. शेवटी गडकरींनी यवतमाळचे कवी म. म देशपांडे यांची 'तहान' ही कविता सादर करुन आपलं मनोगत संपवलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने