तारखांच्या विलंबावरून आयोगावर हल्लाबोल; काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर करणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाला काँग्रेसने लक्ष्य केले आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना सरकारी खर्चाने प्रचार करता यावा यासाठी हिमाचल प्रदेशासोबत निवडणूक जाहीर झाली नसल्याचा हल्ला काँग्रेसने चढवला.त्याचप्रमाणे, पंतप्रधानांना प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी फीत कापता यावी यासाठी मोरबी येथील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेचा दुखवटा देखील तीन दिवसांनी जाहीर करण्यात आला, असाही खळबळजनक आरोप कॉंग्रेसने केला.



गुजरात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेडा आणि गुजरातचे प्रभारी रघू शर्मा यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.हिमाचल प्रदेशची निवडणूक १४ ऑक्टोबरला जाहीर झाली होती. तर गुजरातसाठी हा विलंब का केला, दोन्ही राज्यांची निवडणूक आयोगाने एकाच वेळी का जाहीर केली नाही, असा सवाल रघू शर्मा यांनी केला.आयोगाने याचे उत्तर द्यावे, अशी मागणीही रघु शर्मा यांनी केली. ते म्हणाले, की निवडणूक जाहीर होताच आचार संहिता लागू होत असते. मात्र हिमाचल प्रदेशात १४ ऑक्टोबरला निवडणूक जाहीर होऊनही तीन दिवसांनी म्हणजे १७ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू करण्यात आली. हे केवळ पंतप्रधानांच्या सभेसाठी करण्यात आले होते. गुजरातमध्ये सरकारी साधनांचा वापर करून सत्ताधारी भाजपचा प्रचार केला जात आहे.पंतप्रधान मोदींचे १० मार्चपासून ते १ नोव्हेंबरपर्यंत झालेले सर्व दौरे सरकारी खर्चाने झाले आहेत. मोरबी येथे पूल कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर कॉंग्रेसने पाच सभा रद्द केल्या होत्या. परंतु पंतप्रधान मोदींनी असंवेदनशीलपणे मोरबीला न जाता सरकारी कार्यक्रमांना प्राधान्य दिले, असाही टोलाही रघु शर्मा यांनी लगावला.

निवडणूक आयोगाला चिमटा

पवन खेडा यांनी, निवडणूक आयोगाला चिमटा काढताना इलेक्टोरल बॉन्डवर निवडणूक आयोगाची सक्रियता कुठे गेली, असा सवाल केला. पवन खेडा म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘रेवडी’ शब्द उच्चारताच मोफत योजनांबद्दल निवडणूक आयोगाने पुढे सरसावून राजकीय पक्षांना विचारणा केली. मात्र आयोगाची ही सक्रियता इलेक्टोरल बॉन्डबद्दल दिसलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने